
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची धग अजून ताजी असतानाच, नाशिकमधून अशीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नाशिकमधील गंगापूर परिसरात भक्ती अपूर्व गुजराथी (३७) या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, भक्तीच्या नातेवाईकांनी तिच्या सासू, सासरे, पती आणि नणंद यांच्यावर तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
गंगापूर रोडवरील अथर्व योगेश गुजराथी (४०) यांची पत्नी भक्ती गुजराथी हिने घरातच गळफास लावून घेतला. भक्तीचे वडील दिलीप प्रभाकर माडीवाले हे सराफी व्यावसायिक आहेत. मुलीने आत्महत्या केल्याचे कळताच त्यांनी तातडीने नाशिक गाठले आणि गंगापूर पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली. मृत भक्तीला ५ वर्षांचा मुलगा आहे. तिच्या कुटुंबीयांनी फरार पती अथर्व गुजराथीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे.
पोलिसांनी तोंडी आश्वासन दिल्यानंतर भक्तीवर तिच्या मूळ गावी येवला येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, या अंत्यसंस्कारावेळी येवला येथील नागरिक आणि संतप्त नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. "आमच्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे!", "दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे!", "अटक करा, अटक करा, दोषींना अटक करा!" अशा आशयाचे फलक हातात घेऊन त्यांनी न्याय मागण्यासाठी टाहो फोडला.
पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे संपूर्ण राज्य हादरले आहे. आता नाशिकमधील भक्ती गुजराथी प्रकरणातील आरोपही तितकेच गंभीर आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन भक्तीला न्याय मिळावा, अशी भावना आता जनमानसात व्यक्त होत आहे. 'भक्तीला न्याय मिळेल का?' हा प्रश्न सध्या अनेकांच्या मनात घोळत आहे. या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.