
Beed Scam : बीड जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. धार्मिक कार्याच्या नावाखाली जनतेकडून कोट्यवधी रुपयांचा निधी गोळा करून बनावट कागदपत्रांच्या आधारे बँका आणि आयकर विभागाची फसवणूक करणाऱ्या गुलजार-ए-रझा (Gulzar-e-Raza) या ट्रस्टचा दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) पर्दाफाश केला आहे. ATS च्या सखोल तपासात या ट्रस्टने तब्बल 4 कोटी 73 लाख 67 हजार रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले आहे.
ATS च्या तपासात मोठा आर्थिक घोटाळा उघड
दहशतवाद विरोधी पथकाच्या संभाजीनगर युनिटकडून बीड जिल्ह्यातील विविध एनजीओ आणि ट्रस्टची नियमित पडताळणी सुरू होती. याच दरम्यान गुलजार-ए-रझा या ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांमध्ये संशयास्पद बाबी आढळून आल्या. ट्रस्टकडून धार्मिक उपक्रमांसाठी देणग्या गोळा केल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र तांत्रिक आणि आर्थिक तपासात या निधीचा गैरवापर झाल्याचे स्पष्ट झाले.
बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक आणि आयकर विभागाची फसवणूक
ATS च्या चौकशीत या ट्रस्टने बनावट कागदपत्रांचा वापर करून बँक खाती, आर्थिक व्यवहार आणि आयकर विवरणपत्रांमध्ये फेरफार केल्याचे समोर आले आहे. गोळा करण्यात आलेल्या देणग्यांचा वापर धार्मिक कार्यासाठी न करता वैयक्तिक आणि संशयास्पद कारणांसाठी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घोटाळ्यामुळे शासन यंत्रणा आणि दानशूर नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.
-चार विश्वस्तांविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी ATS पथकाने बीड जिल्ह्यातील माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात चार विश्वस्तांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत –
या सर्व आरोपींची भूमिका तपासात निष्पन्न झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
या कारवाईमुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धार्मिक ट्रस्टच्या नावाखाली अशा प्रकारचा आर्थिक घोटाळा समोर आल्याने इतर एनजीओ आणि ट्रस्टच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ATS कडून पुढील तपास सुरू असून, आणखी आर्थिक गैरव्यवहार उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.