
बीड: ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या २,४६७ कोटी रुपयांच्या गुंतवणूक फसवणूक प्रकरणात सक्तवसुली संचालनालय (ED) ने मोठी कारवाई करत कुटे ग्रुपशी संबंधित तब्बल १८८ कोटी ४१ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या कारवाईमुळे बीडमधील कुटे ग्रुपचे साम्राज्य हादरले असून त्यांच्या अनेक कंपन्यांच्या मालमत्तांवर टाच आणण्यात आली आहे.
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये जमीन, इमारती, औद्योगिक प्लांट आणि विविध यंत्रसामग्रीचा समावेश आहे. सर्व मालमत्ता बीड जिल्ह्यात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणात ईडीने आतापर्यंत १६२१ कोटी ८९ लाख रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता जप्त केली असून तपास अजून सुरू आहे.
ईडीच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे की, सुरेश कुटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्ञानराधा मल्टिस्टेट सोसायटीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक केली. विविध आकर्षक योजनांच्या आडून सुमारे ४ लाख गुंतवणूकदारांकडून हजारो कोटींच्या ठेवी स्वीकारल्या गेल्या आणि त्या रकमा ‘द कुटे ग्रुप’च्या कंपन्यांकडे कर्जाच्या स्वरूपात वळवण्यात आल्या.
गेल्या वर्षी मे ते जुलै महिन्यांदरम्यान या प्रकरणी सुरेश कुटे यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध नऊ फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसुरक्षा कायदा (MPID) आणि फसवणुकीसंदर्भातील विविध कलमांखाली ही गुन्हे नोंदविण्यात आली आहेत.
ईडीने तपासादरम्यान स्पष्ट केले की सुरेश कुटे आणि त्यांच्या पत्नीच्या मालकीच्या कंपन्यांना अवैधरित्या मोठ्या प्रमाणात निधी वळवण्यात आला. हा निधी कायदेशीरपणे गुंतवणूकदारांना परत दिला जाणे अपेक्षित होते. परंतु, तो अन्यत्र वळवून स्वतःच्या फायद्यासाठी वापरण्यात आला.
या घोटाळ्यातील गुंतवणूकदारांची संख्या आणि रकमेची व्याप्ती पाहता, हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आर्थिक फसवणूक प्रकरणांपैकी एक मानले जात आहे. ईडीने यापूर्वी तीन वेळा मालमत्तांवर टाच आणली होती आणि आता चौथ्यांदा आणखी कारवाई करत १८८ कोटींच्या मालमत्तांवर कब्जा केला आहे.
गुंतवणूकदारांनी अशा योजनांपासून सावध राहणे गरजेचे आहे. एखादी योजना अतिशय फायदेशीर वाटत असल्यास, त्यामागील पारदर्शकतेची खात्री करणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवहारात जाणीवपूर्वक शहाणपणाने निर्णय घेणं हाच चांगल्या गुंतवणुकीचा मूलमंत्र आहे.