
पिंपरी-चिंचवड- वाल्हेकरवाडी परिसरात रविवारी रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण पिंपरी-चिंचवड हादरून गेले आहे. अवघ्या १८ वर्षांच्या कोमल भरत जाधव या तरुणीची तिच्या राहत्या परिसरातच भररस्त्यात धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे, या घटनेत तिच्याच शेजाऱ्याचा हात असल्याचे उघडकीस आले आहे.
रविवारी (११ मे) रात्री कोमल जाधव घरात असताना बाईकवरून दोन जण आले. त्यांनी तिला बाहेर बोलावून घेतले. कोमल घराबाहेर आली, आणि ती समोर येताच दोघांनी तिच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात कोमलचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत तातडीने तपास सुरू केला. केवळ २४ तासांतच आरोपींचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. कोमलच्या खुनाच्या आरोपाखाली उदयभान यादव (वय ४५) आणि त्याचा सख्खा भाचा यांना अटक करण्यात आली आहे. उदयभान यादव मूळचा उत्तर प्रदेशचा असून, कोमलच्या घराच्या शेजारी राहत होता.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कोमल आणि आरोपी उदयभान यांच्यात पूर्वी काही वैयक्तिक संबंध होते. त्यातच आर्थिक व्यवहार झाल्याचेही समोर आले आहे. या संबंधांमधूनच दोघांमध्ये वाद निर्माण झाले होते. त्याच रागातून उदयभानने आपल्या भाच्याच्या मदतीने कोमलची हत्या करण्याचा कट रचला आणि रविवारी रात्री तो अमलात आणला.
या हत्येनंतर वाल्हेकरवाडी परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. घराजवळच अशा प्रकारे एका तरुणीचा जीव घेण्यात आल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. स्थानिकांनी पोलिसांकडे सुरक्षेच्या उपाययोजनांची मागणी केली आहे.
वानवडी पोलिस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपशीलवार तपास करत असून, आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानंतर अजून काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.
एकीकडे महिलांच्या सुरक्षिततेसाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात असताना, अशा घटनांमुळे समाजमन हादरतं. अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळावी, हीच सामान्य जनतेची अपेक्षा आहे.