
बारामती: बारामती शहरावर रविवारी दुपारी ढगफुटी सदृश पाऊस कोसळला आहे. शहरातील अनेक भाग जलमय झाले असून, तीन इमारती खचल्या आहेत आणि कालवा फुटल्याने परिस्थिती आणखीनच गंभीर झाली आहे. प्रशासन, नागरिक आणि आपत्कालीन पथकांनी शर्थीचे प्रयत्न करत मोठी दुर्घटना टाळली.
या मुसळधार पावसामुळे शहरातील तीन इमारतींना तडे गेले आणि त्या अंशतः खचल्या. सुदैवाने, नागरिकांना वेळीच सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्यामुळे कोणतीही जीवितहानी टळली आहे. या भागात एनडीआरएफचं पथकही लवकरच दाखल होणार आहे, अशी माहिती मिळत आहे.
कालवा फुटल्यामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचलं असून, वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. अनेक रस्ते बंद झाले असून, वाहनचालक आणि प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.
संपूर्ण प्रशासन यंत्रणा अलर्ट मोडवर असून, बचावकार्याला गती देण्यात आली आहे. कोणालाही धोका होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय राबवले जात आहेत. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीकरांना "गरज असल्यासच घराबाहेर पडा, काळजी घ्या" असे आवाहन केले आहे.
पुणे जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाने कहर केला असून, शेतीचे मोठे नुकसान आणि रस्त्यांवर पाणी साचल्याच्या तक्रारी येत आहेत. हवामान विभागाने पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
बारामतीतील ही ढगफुटी सदृश परिस्थिती नागरिकांसाठी मोठा इशारा आहे. सुदैवाने यावेळी जीवितहानी टळली असली, तरी हवामानाची स्थिती लक्षात घेता नागरिकांनी जास्तीत जास्त काळजी घेणं गरजेचं आहे.