
Baramati Accident : बारामती तालुक्यातील जळगाव क.प. गावाजवळ सोमवारी रात्री भीषण अपघात घडला. अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत ग्रामसेवक मधुकर धोंडीबा जगताप यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून संतप्त ग्रामस्थांनी काही काळ रास्ता रोको आंदोलन केले.
या अपघातात मधुकर धोंडीबा जगताप (रा. भिलारवाडी) यांचा मृत्यू झाला. ते मेडद ग्रामपंचायतीत ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. सोमवारी रात्री काम आटोपून ते घरी परतत असताना जळगाव क.प. जवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. या राज्य मार्गावर अद्याप गतिरोधक नसल्यामुळेच वारंवार अपघात होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. याच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी काही काळ रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.
घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलीस स्थानकचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे आणि त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत परिस्थिती नियंत्रणात आणली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लवकरच या ठिकाणी गतिरोधक बसवले जातील, असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
दरम्यान, अपघात घडवून पसार झालेल्या वाहनाचा क्रमांक पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात संबंधित चालकाविरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. कर्तव्यदक्ष म्हणून ओळख असलेल्या मधुकर जगताप यांच्या अचानक निधनामुळे भिलारवाडी आणि मेडद परिसरात शोककळा पसरली आहे.