छगन भुजबळांना अखेर मंत्रिमंडळात प्रवेश; अंजली दमानिया यांनी साधला मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Published : May 20, 2025, 10:46 AM IST
anjali damania

सार

Maharashtra Politics : छगन भुजबळ यांची मंत्रीमंडळात वर्णी लागल्याने अंजली दमानिया यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्र सोडले आहे. याशिवाय एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार असा सवालही केला आहे.

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट ज्येष्ठ नेते आणि येवलेचे आमदार छगन भुजबळ यांची अखेर राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. महायुती सरकार स्थापन झाल्यापासून भुजबळ यांना डावलण्यात आल्याची चर्चा होती. स्वतः भुजबळांनीही वेळोवेळी आपली नाराजी व्यक्त केली होती. आता त्यांच्या मंत्रिपदावर शिक्कामोर्तब झाल्याने ही चर्चा थांबली असली, तरी त्यांच्या प्रवेशावरून वाद पुन्हा चिघळले आहेत.

भुजबळांना मिळणार अन्न व नागरी पुरवठा खाते? मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडेंकडील अन्न व नागरी पुरवठा खाते छगन भुजबळ यांच्याकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत हे खाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातील पुनर्प्रवेशाच्या शक्यता धूसर झाल्या आहेत, अशी चर्चा सुरू आहे.

अंजली दमानियांचा संताप छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळातील समावेशावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल केला आहे.

“वाह फडणवीस वाह! एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार? जनता अशीच भरडली जाणार का? की आम्ही भ्रष्टाचारविरोधी लढा देणाऱ्यांना संदेश द्यायचा की, 'तुम्ही आमचं काहीच वाकडं करू शकत नाही'? असा काय नाईलाज आहे? सभ्य माणसं मिळत नाहीत का राजकारणात?” – असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

तसेच भुजबळांच्या तुरुंगातील काळातील एका फोटोचा उल्लेख करत, "तेव्हा छातीत कळ यायची, आता ठणठणीत? किळस वाटतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची", अशी तीव्र टीकाही त्यांनी केली आहे.

“भ्रष्टाचारींवर कारवाई”चा हवाला दमानिया यांनी सरकारच्या निवडणूक घोषणांचेही स्मरण करून दिलं. "भ्रष्टाचारींवर कारवाई, ‘अब की बार ४०० पार’ अशी वचने दिली, ती हीच कारवाई का?" असा उपरोधिक सवाल त्यांनी केला.

नाशिक व रायगड पालकमंत्री पदांवर प्रश्नचिन्ह मंत्रिपदाचा तिढा सुटलेला असला तरी नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांचा तिढा अद्याप कायम आहे. रायगडसाठी शिवसेनेचे भरत गोगावले यांनी जोरदार मागणी केली आहे. मात्र, भुजबळांच्या मंत्रिपदामुळे रायगडचा पालक मंत्रीपद गोगावलेंना दिला जाऊन नाशिक भुजबळांकडे राहणार, अशी शक्यता आहे. अशा स्थितीत आदिती तटकरे यांना रायगडच्या दाव्यावर माघार घ्यावी लागणार, हे स्पष्ट होत आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

मोठी बातमी! शेतकरी कुटुंबाला मिळतील 'एवढे' लाख रुपये, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
Ladki Bahin Yojana : २१०० रुपये नेमके कधी मिळणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत ठाम घोषणा