
Maharashtra : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक निर्णय घेतला आहे. अजित पवार यांच्या आकस्मिक जाण्याने पक्षाला मोठा धक्का बसला असून, या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर पक्षाने निवडणूक प्रचार पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे.
28 जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीकडे जात असताना अजित पवार यांच्या विमानाचा बारामती विमानतळाजवळ भीषण अपघात झाला. लँडिंगच्या तयारीत असताना विमान अचानक एका बाजूला कोलमडले आणि थेट शेतात कोसळले. अपघातानंतर मोठा स्फोट झाला असून या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. काल बारामतीसह राज्यभर शोककळा पाळण्यात आली. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो कार्यकर्ते, समर्थक आणि नेत्यांनी शेवटचे दर्शन घेतले. त्यांच्या जाण्याने पवार कुटुंबासह संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाकडून कोणत्याही प्रचार सभा किंवा रोड शो आयोजित केले जाणार नाहीत. उमेदवारांनी फक्त घरोघरी जाऊन मतदारांना पत्रके वाटून प्रचार करावा, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. तसेच निवडणूक जिंकल्यानंतरही कोणतीही मिरवणूक काढली जाणार नाही, असे पक्षाने जाहीर केले आहे.
महापालिका निवडणुकांनंतर अजित पवार यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी कंबर कसली होती. 28 जानेवारी रोजी त्यांच्या बारामतीत चार सभा नियोजित होत्या, मात्र अपघातामुळे त्या होऊ शकल्या नाहीत. आता निवडणुका तोंडावर असताना त्यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून, प्रचार धोरणात मोठा बदल करण्यात आला आहे.