
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणूक कार्यक्रमात बदल करण्यात आला असून, मतदान आणि मतमोजणीच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर राज्यात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे 12 जिल्हा परिषदांतील आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आधी 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणारे मतदान आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. तसेच 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणारी मतमोजणी आता 9 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 13 जानेवारी 2026 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार
नामनिर्देशनपत्र दाखल करणे
नामनिर्देशनपत्रांची छाननी
अर्ज मागे घेणे
चिन्ह वाटप
अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे
हे सर्व टप्पे पूर्ण झाले आहेत. आता फक्त मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत.
मा. सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2026 नंतर केवळ दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली होती. मात्र, 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याने राज्य सरकारने 28 ते 30 जानेवारी 2026 या कालावधीत दुखवटा जाहीर केला. या परिस्थितीचा विचार करून निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी 31 जानेवारी 2026 रोजी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील.
मतदान:
7 फेब्रुवारी 2026
सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30
जाहीर प्रचार समाप्ती:
5 फेब्रुवारी 2026, रात्री 10 वाजता
मतमोजणी:
9 फेब्रुवारी 2026
सकाळी 10 वाजल्यापासून
आचारसंहिता
निकाल जाहीर होताच संपुष्टात
निवडून आलेल्या सदस्यांची नावे:
11 फेब्रुवारी 2026 पर्यंत शासन राजपत्रात प्रसिद्ध
दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. मात्र दुखवट्यामुळे प्रचाराला तात्पुरता ब्रेक लागला असून, दुखवटा संपल्यानंतर पुन्हा एकदा प्रचाराला वेग येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत राजकीय घडामोडी अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.