
Accidental Death Of Politicians in Maharashtra : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज (28 जानेवारी) बारामती येथे विमान अपघातात निधन झाले आहे. अजित पवार आज बारामतीमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारासाठी विविध सभांना संबोधित करणार होते. या अपघातात अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेने देशासह राज्याच्या राजकरणात हळहळ व्यक्त केली जात आहे. पण अजित पवारांसह याआधी महाराष्ट्रातील काही राजकरणी नेतेमंडळींचा देखील अपघाती मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांचा फेब्रुवारी २०२५ मध्ये अकोला येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. अकोला–मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावरील शिवणी टी-पॉईंटजवळ हा अपघात घडला. तुकाराम बिडकर हे दुचाकीवरून प्रवास करत असताना एका भरधाव पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की त्यांचा जागीच मृत्यू झाला.
गडचिरोलीच्या राजकीय क्षेत्रातील एक सक्रिय आणि प्रभावी नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महिला प्रदेश उपाध्यक्ष गीताताई हिंगे यांचे डिसेंबर २०२५ मध्ये दुर्दैवी अपघाती निधन झाले. नागपूरहून गडचिरोलीकडे येत असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाला, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
गीताताई हिंगे यांनी गडचिरोलीच्या राजकारणात महत्त्वाचे योगदान दिले होते. त्यांनी यापूर्वी भाजपमध्ये जिल्हा अध्यक्ष आणि जिल्हा महामंत्री यांसारखी जबाबदारीची पदे यशस्वीपणे सांभाळली होती. स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करण्यासाठी त्यांचे कार्य मोठ्या प्रमाणावर ओळखले जात होते.विशेष म्हणजे, अवघ्या काही दिवसांपूर्वीच म्हणजे २६ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता.
दिवंगत नेते विनायक मेटे यांचा १४ ऑगस्ट २०२२ रोजी झालेला अपघात महाराष्ट्राच्या राजकारणासाठी धक्कादायक ठरला. १४ ऑगस्टची पहाट राज्यासाठी जणू काळरात्र ठरली, कारण मुंबई–पुणे एक्स्प्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातात मेटेंचे निधन झाले.मराठा आरक्षणासंदर्भातील महत्त्वाच्या बैठकीसाठी विनायक मेटे हे बीडहून मुंबईकडे येत होते. प्रवासादरम्यान मुंबई–पुणे एक्स्प्रेसवेवर त्यांच्या कारचा चालकावरील ताबा सुटला आणि वाहन थेट एका मोठ्या ट्रकवर जाऊन आदळले. हा अपघात इतका भीषण होता की वाहनाचे मोठे नुकसान झाले.अपघातानंतर विनायक मेटेंना वेळेत वैद्यकीय मदत मिळू शकली नाही. त्यांना तातडीने नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या अचानक निधनाने मराठा समाजासह संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आणि राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली.
माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे ३ जून २०१४ रोजी झालेल्या भीषण रस्ते अपघातानंतर दुर्दैवी निधन झाले होते. त्या दिवशी पहाटे सुमारे सहाच्या सुमारास ते आपले सचिव आणि चालक यांच्यासह दिल्ली विमानतळाकडे निघाले होते.याच दरम्यान त्यांच्या कारला दुसऱ्या एका वाहनाने जोरदार धडक दिली. अपघातानंतर त्यांना तात्काळ दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या भीषण अपघातात त्यांच्या सचिव आणि चालक हे दोघेही सुदैवाने बचावले होते. गोपीनाथ मुंडे यांच्या अचानक निधनाने संपूर्ण देशाच्या राजकारणात शोककळा पसरली होती आणि त्यांच्या जाण्याने भाजपला मोठा धक्का बसला होता.