
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि खासदार शरद पवार यांची भेट घेतली. विशेष म्हणजे ही भेट तासभर चालली आणि अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये ही महत्त्वाची भेट पार पडली. अजित पवार यांनी बंड करून वेगळा गट स्थापन केल्यापासून, दोनही गट वेगवेगळ्या वाटांनी चालले आहेत. एक सत्तेत, तर दुसरा विरोधात. मात्र, काका-पुतण्यांमधील नातं तसंच राहिल्याचे अनेकदा दिसून आलं आहे. आजच्या भेटीतही राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक मुद्यांवर सखोल चर्चा झाली.
सदर भेटीचा प्रमुख उद्देश माळेगाव सहकारी साखर कारखान्याशी संबंधित असल्याची माहिती आहे. यासोबतच राज्यातील पूरस्थिती, मदतकार्य, पंचनामे आणि अतिवृष्टीग्रस्तांसाठी निधी गोळा करण्याच्या हालचालींवरही चर्चा झाल्याचे समजते. शरद पवार यांनी मदतीच्या योजनांबाबत सविस्तर विचारणा केली, तर अजित पवार यांनी सरकारच्या उपाययोजनांची माहिती दिली.
ही बैठक पूर्णपणे राजकीय नसून, काही कौटुंबिक बाबींवरही या दोघांमध्ये चर्चा झाली. दोघांचे संबंध केवळ राजकीय न राहता वैयक्तिक पातळीवरही कायम असल्याचे या भेटीतून पुन्हा स्पष्ट झाले आहे.
हे दोन्ही नेते यापूर्वीही अनेकवेळा एकत्र दिसले आहेत.कार्यक्रम असोत वा कौटुंबिक समारंभ. काही महिन्यांपूर्वी दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील, अशा चर्चांना उधाण आले होते. जरी त्या चर्चा पुढे थांबल्या, तरी अशा भेटी पुन्हा सुरू झाल्याने पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतांवर नव्याने चर्चा सुरू होण्याची चिन्हं आहेत.