लेकाच्या भेटीसाठी लंडनच्या वाटेवर... सांगोल्याच्या पवार दाम्पत्यांवर काळाने घेतला घाला, एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत 242 पैकी फक्त एक जिवंत!

Published : Jun 12, 2025, 10:12 PM IST
pandarhpur couple

सार

एअर इंडियाचे विमान अहमदाबादहून लंडनला जाताना कोसळले, ज्यात 242 प्रवाशांपैकी केवळ एक जण जिवंत सापडला. सांगोला तालुक्यातील पवार दाम्पत्यही या दुर्घटनेत होते.

अहमदाबाद : “लेकाला भेटण्याची आस... आणि त्या वाटेवर काळाचा थरकाप” सांगोला तालुक्यातील हातीद गावातील महादेव पवार आणि त्यांची पत्नी आशा पवार हे आपल्या मुलाकडे, लंडनला भेटायला निघाले होते. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. एअर इंडियाचं AI 171 हे विमान अहमदाबादहून लंडनला जात असताना, टेकऑफनंतर अवघ्या काही मिनिटांतच कोसळलं. या हृदयद्रावक अपघातात 242 प्रवाशांपैकी केवळ एक प्रवासी जिवंत सापडला आहे.

विमानाने दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतले. अवघ्या 35 सेकंदात पायलटने ATC ला ‘मेडे’ कॉल केला म्हणजेच आणीबाणीची सूचना. पण त्या क्षणानंतर विमानाचा संपर्क तुटला आणि काही क्षणातच एक प्रचंड स्फोट झाला. AI 171 हे विमान थेट बी.जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर जाऊन आदळलं. स्फोटात अनेक विद्यार्थीही गंभीर जखमी झाले, तर काहींनी जीव गमावला.

दुर्घटनेनंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. धुराच्या लोटांतून, आगीच्या ज्वाळांमधून बचावपथकांनी मोर्चा सुरू केला. सोशल मीडियावर या अपघाताचे व्हिडीओ आणि फोटो वेगाने व्हायरल होत आहेत, जे पाहून या घटनेची तीव्रता आणि वेदना प्रकर्षाने जाणवते.

पवार दाम्पत्याचा जीव या दुर्घटनेत गेला असल्याचं अद्याप अधिकृतपणे जरी जाहीर झालेलं नसलं, तरी प्रवाशांच्या यादीत त्यांची नावं स्पष्ट दिसून येतात. लंडनमध्ये त्यांचा मुलगा त्यांची वाट पाहत होता पण त्याच्या स्वप्नातही न बसणारी बातमी त्याला ऐकावी लागली.

या अपघातावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तातडीनं अहमदाबादला पोहोचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि यंत्रणांना आवश्यक ती दिशा दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या भीषण घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे. परंतु, संपूर्ण चौकशी केल्यानंतरच प्रत्यक्ष कारण स्पष्ट होईल.

या अपघाताने अनेक कुटुंबांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. पवार दाम्पत्याप्रमाणेच अनेकजण स्वप्नांच्या शहरात निघाले होते – पण नियतीच्या एका झटक्याने त्यांचं आयुष्य अधांतरी राहिलं.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Mahavistar AI App : शेतीत डिजिटल क्रांती! महाविस्तार एआय अॅप कसा वापरायचा?, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Police Bharti 2025 : पुण्यात पोलीस व्हायचंय? २,००० पदांसाठी तब्बल २.२० लाख अर्ज, पुणे पोलीस मेगा भरतीचा अर्ज भरण्यापूर्वी हे वाचा