
अहिल्यानगर: राजकीय रंगमंचावर सतत नवे प्रयोग करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा आपल्या दौऱ्यातून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू केली आहे. श्रीरामपूर दौऱ्यानंतर त्यांनी नगर शहरातील तरुण उद्योजक अफजल शेख यांच्या घरी दिलेल्या अचानक भेटीमुळे सध्या जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे.
अफजल शेख हे एकेकाळी आमदार संग्राम जगताप यांचे निकटवर्तीय मानले जात होते. मात्र अलीकडच्या काळात मतभेदांमुळे ते दूर गेले होते. अशा पार्श्वभूमीवर शेख यांच्या घरी पवारांनी केलेली भेट ही केवळ सौजन्यभेट नसून आगामी विधानसभा निवडणुकांच्या रणनीतीचा भाग असल्याचे संकेत मिळत आहेत.
विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वी निधन पावलेले माजी आमदार अरुणकाका जगताप हे पवारांचे जुने विश्वासू होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांकडे सांत्वन व्यक्त करण्याची अपेक्षा असताना, पवारांनी त्याकडे न जाता त्यांच्या राजकीय विरोधकाकडे वळणे – हे स्पष्टपणे वेगळी दिशा दर्शवणारे आहे.
सध्या आमदार संग्राम जगताप हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात असून त्यांनी त्याच गटाकडून विधानसभेची निवडणूक जिंकली आहे. त्यांच्याविरोधात शरद पवार गटाने दादा कळमकर यांचे पुतणे अभिषेक कळमकर यांना उमेदवारी दिली होती, मात्र ते पराभूत झाले. याच निवडणुकीदरम्यान अफजल शेख यांनी जगताप यांच्याशी दुरावा घेतला आणि आता शेख यांच्याशी थेट पवारांची भेट घडवून आणण्यात खासदार निलेश लंके यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.
ही भेट केवळ दस मिनिटांची असली तरी त्याचा राजकीय अर्थ खोल आहे. यावेळी पवारांसोबत खासदार लंके, माजी आमदार दादा कळमकर, फारूक शेख यांच्यासह अनेक स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते, हेही लक्षवेधी आहे.
शरद पवार हे अनेकदा आपल्या अनपेक्षित निर्णयांनी चर्चेत राहतात. याही वेळी त्यांनी दिलेली ही भेट हे जगताप कुटुंबीयांना अप्रत्यक्षपणे राजकीय इशारा असल्याचे मानले जात आहे. अफजल शेख यांच्यासारख्या तरुण नेतृत्वाला पुढे आणून पवार गट नगरमधील राजकारणात नवे समीकरण उभे करू पाहत आहे, असे संकेत मिळत आहेत.
ही चाल यशस्वी ठरली, तर अजित पवार गटाच्या बुरुजावर मोठा धक्का बसू शकतो. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांत नगर जिल्ह्यातील चित्र अधिकच रोचक होणार आहे.
शेख यांना मिळालेली ही भेट आणि संभाव्य पाठिंबा यामुळे नगरमधील राजकारणात नव्या शक्तींचा उदय होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांची ही टायमिंग आणि रणनीती पुन्हा एकदा त्यांच्या खेळीबाज वृत्तीचे उदाहरण ठरते.