
छ. संभाजीनगर - महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा गरम झालं आहे. मुंबई महापालिका आणि अन्य महत्त्वाच्या महानगरांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, ठाकरे बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर आज एक मोठी राजकीय घटना घडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये भेट झाली. या दोघांची ही भेट केवळ औपचारिक नव्हती, तर संभाव्य युतीसाठीचा एक महत्त्वाचा संकेत मानली जात आहे.
प्रकाश महाजन यांनी या भेटीबाबत 'एबीपी माझा'शी बोलताना सूचक आणि मिश्किल भाष्य केलं. त्यांनी म्हटलं "आमचे जुने संबंध आहेत. आम्ही पूर्वी एका पक्षात एकत्र होतो. भेटायला आलो. तेही पैलवान, मीही पैलवान. त्यांनी पाडायचं होतं, मी पाडलं – एवढंच आहे." पुढे मनसे-उबठा युतीच्या शक्यतेवर बोलताना महाजन म्हणाले. “आकाशात चांगले ग्रह, तारे एकत्र येत आहेत. काय होईल ते सांगता येत नाही. चांगले नक्षत्र असल्यावर चांगली घटना घडते. अजून धुमकेतू चमकला नाही.” हे वक्तव्य खूपच सूचक असून, संभाव्य युतीच्या चर्चांना नवा जीव देणारं आहे.
शिवसेना (उबठा) गटाचे अंबादास दानवे यांनीही ही भेट फक्त औपचारिक असल्याचा दावा केला, पण त्यांच्या शब्दांतही सूचकता जाणवली. त्यांनी सांगितलं. "प्रकाश महाजन हे आमचे जुने सहकारी आहेत. गेल्या काही दिवसांतील घडामोडींमुळे मला वाटलं की त्यांना प्रत्यक्ष भेटायला यावं. आमच्यात सातत्याने संपर्क राहिलेला आहे."
या भेटीकडे केवळ एक जुनी मैत्री नव्हे, तर राजकीय पुनर्रचना म्हणूनही पाहिलं जात आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील दरी काही वर्षांपासून वाढली असली, तरी सध्याच्या राजकीय परिस्थितीत दोघांचं एकत्र येणं हे भाजपसाठी मोठं आव्हान ठरू शकतं.
शिवसेना (उबठा) आणि मनसे यांचं संभाव्य एकत्र येणं म्हणजे केवळ दोन पक्षांचा नाही, तर ठाकरे बंधूंच्या नात्याचा नव्याने उलगडणारा अध्याय असू शकतो. "धुमकेतू अजून चमकला नाही," हे वक्तव्य भविष्यात कोणता नवा राजकीय प्रकाश झोत टाकणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.