पुण्यातून चंद्रपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला भीषण अपघात, ३० प्रवासी जखमी

Published : Apr 19, 2025, 12:34 PM ISTUpdated : Apr 19, 2025, 12:56 PM IST
बस अपघात

सार

यवतमाळ जिल्ह्यातील इचोरी घाटात शनिवारी सकाळी खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या खाली उतरून झाडावर आदळली, सुदैवाने दरीत कोसळण्यापासून वाचली. या अपघातात सुमारे ३० प्रवासी जखमी झाले.

पुण्याहून चंद्रपूरकडे निघालेली खासगी प्रवासी बस शनिवारी सकाळी भीषण अपघातात सापडली. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा मार्गावरील इचोरी घाटात सकाळी सुमारे ९ वाजता ही घटना घडली. वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या खाली उतरली व झाडावर आदळून पलटी झाली. सुदैवाने बस झाडाला धडकली नसती तर ती थेट दरीत कोसळली असती आणि मोठा अनर्थ घडला असता.

या अपघातात सुमारे ३० प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व प्रवाशांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच लाडखेड व यवतमाळ ग्रामीण पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बचाव कार्य हाती घेत जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले. अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांचे मोबाइल फोन्स, सामान, तसेच बॅगा या अपघातानंतर रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेल्या दिसून आल्या. काही प्रवाशांनी आपले सामान हरवण्याबाबत चिंता व्यक्त केली.

घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. पोलिसांनी उपस्थितांच्या मदतीने वाहतूक सुरळीत केली. बस अपघातानंतर घाटातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

PREV

Recommended Stories

आजपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन, पहिल्याच दिवशी 4 मोठे मोर्चे, 4 आत्महत्यांचे गंभीर इशारे, 15 धरणे आंदोलन, 9 उपोषणे
Winter Session Nagpur 2025 : हिवाळी अधिवेशनात IAS तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची BJP करणार मागणी, ‘स्मार्ट सिटी’ प्रकरण पुन्हा ऐरणीवर