पक्षी झोपेत असतानाही झाडाच्या फांदीवरून कधीच खाली पडत नाहीत. हे कसं शक्य होतं, याचा तुम्ही कधी विचार केलाय का? पक्ष्यांना मदत करणाऱ्या 'टेंडन लॉकिंग मेकॅनिझम'बद्दल जाणून घ्या.
आपण झोपेत अनेकदा कुशीवर वळतो. कधी कधी तर आपण पलंगावरून खालीही पडतो. पण एखादी छोटी चिमणी किंवा पोपट बारीक फांदीवर झोपला तरी खाली पडत नाही. वादळ आलं तरी ते फांदी घट्ट पकडून ठेवतात. त्यांच्या पायाला डिंक लावलाय की काय, असं आपल्याला वाटतं. यामागे कोणतीही जादू नाही, तर एक भन्नाट बायोलॉजी आहे.
24
ही जादू नेमकी कशी काम करते?
पक्ष्यांच्या पायांमध्ये एक खास ऑटोमॅटिक लॉकिंग सिस्टीम असते. विज्ञानात याला 'टेंडन लॉकिंग मेकॅनिझम' (Tendon Locking Mechanism) म्हणतात. पक्ष्याच्या पायाच्या मागच्या बाजूला एक लांब स्नायू (tendon) असतो. हा स्नायू पायाचा वरचा भाग आणि पायाच्या बोटांची हाडे यांना जोडतो. पक्षी जेव्हा फांदीवर बसतो आणि गुडघे दुमडतो, तेव्हा हा स्नायू आपोआप घट्ट होतो.
34
पॅसिव्ह सिस्टीम
आपण हातात एखादी वस्तू पकडतो तेव्हा आपली मूठ जशी बंद होते, तसंच हे काम करतं. गुडघे दुमडताच पायाची बोटं आपोआप फांदीला घट्ट पकडतात. यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे, यासाठी पक्ष्याला कोणतीही ऊर्जा खर्च करावी लागत नाही. ही एक 'पॅसिव्ह सिस्टीम' (Passive System) आहे.
पक्षी जोपर्यंत बसलेला असतो, तोपर्यंत हे लॉक उघडत नाही. झोपेत स्नायू शिथिल झाले की हे लॉक आणखी मजबूत होतं. त्यामुळे पक्षी जेवढ्या गाढ झोपेत असतो, तेवढी त्याची फांदीवरची पकड घट्ट असते. माणसांसारखं झोपेत स्नायू शिथिल होऊन खाली पडण्याची भीती त्यांना नसते.
पक्ष्याला जेव्हा पुन्हा उडायचं असतं, तेव्हा तो आपले गुडघे सरळ करून उभा राहतो. लगेच स्नायू सैल होतात आणि बोटांचं लॉक उघडतं. त्यानंतर तो सहज उडून जातो. यामागे आणखी एक कारण आहे. बहुतांश पक्षी झोपताना आपल्या शरीराचं संपूर्ण वजन खालच्या दिशेने सोडतात. यामुळे त्यांचा गुरुत्वमध्य (center of gravity) बरोबर फांदीच्या वर असतो. यामुळे त्यांचा बॅलन्स बिघडत नाही.
निसर्गाने पक्ष्यांची शरीररचना किती अचूक बनवली आहे, याचा फक्त विचार करा! या छोट्याशा लॉकिंग सिस्टीममुळेच ते खाली पडण्याच्या भीतीशिवाय फांदीवर शांतपणे झोपू शकतात.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.