प्रत्येकाची क्षमता वेगळी असते आणि ती वय, वजन, आरोग्य स्थिती, सांध्यांच्या समस्या आणि व्यायामाच्या सवयी यांसारख्या घटकांवर अवलंबून असते. म्हणूनच १०,००० पावलांचा 'वन-साईज-फिट्स-ऑल' नियम प्रत्येकासाठी आवश्यक नाही.
ज्यांनी बऱ्याच काळापासून व्यायाम केलेला नाही, ते कमी पावलांपासून सुरुवात करून हळूहळू वाढवू शकतात.
चालताना छातीत दुखल्यास, जास्त धाप लागल्यास, चक्कर आल्यास किंवा इतर कोणतीही असामान्य शारीरिक लक्षणं दिसल्यास, चालणं थांबवून डॉक्टरांचा सल्ला घेणं उत्तम.
मग मुख्य सत्य काय आहे?
१०,००० पावलं हे एक ध्येय असू शकतं, पण तो काही बंधनकारक 'जादुई आकडा' नाही.
अभ्यासातून हेच दिसतं की तुम्ही कमी स्टेप काउंटवरून जास्त स्टेप काउंटकडे जाताना आरोग्याचे फायदे दिसू लागतात. अनेक अभ्यासांमध्ये ७,०००-९,००० पावलांच्या रेंजमध्ये महत्त्वपूर्ण फायदे आढळले आहेत, तर काहींमध्ये १०,००० पर्यंत अतिरिक्त फायदे दिसून आले आहेत.
म्हणून, जर तुम्ही आज फक्त ३,००० पावलं चालत असाल, तर १०,००० पूर्ण न झाल्याची चिंता करू नका. फक्त आजपेक्षा थोडं जास्त चालण्यापासून सुरुवात करा. अजिबात न चालण्यापेक्षा थोडं चाललेलं बरं; आणि नियमित चालणं तर त्याहूनही उत्तम!