Teachers Day 2025 : दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिवशी शिक्षकांच्या प्रति आभार आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. जाणून घेऊया शिक्षक दिन साजरा करण्यामागील महत्व आणि इतिहास सविस्तर…
भारतामध्ये दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्त्वज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त पाळला जातो. डॉ. राधाकृष्णन हे उत्कृष्ट शिक्षक होते. जेव्हा ते भारताचे राष्ट्रपती झाले, तेव्हा त्यांच्या शिष्यांनी आणि चाहत्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, त्यांनी स्वतःच्या वाढदिवसाऐवजी हा दिवस सर्व शिक्षकांचा गौरव करण्यासाठी समर्पित व्हावा असे सुचवले. त्यानंतर ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा होऊ लागला.
25
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे योगदान
डॉ. राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी झाला. ते उत्कृष्ट विद्वान, तत्त्वज्ञानी आणि प्रेरणादायी शिक्षक होते. त्यांनी भारतीय संस्कृती, अध्यात्म, वेदांत तत्त्वज्ञान यांचा अभ्यास करून जगभरात भारतीय परंपरेचा गौरव केला. शिक्षक म्हणून त्यांची ख्याती एवढी होती की विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकण्याचा अभिमान वाटायचा. शिक्षणाला त्यांनी केवळ करिअरची साधनं न मानता ते नैतिक मूल्यांचा आणि व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया मानला. त्यामुळे शिक्षक दिन हा त्यांच्या स्मृतीला सन्मान देण्याचा दिवस आहे.
35
शिक्षक दिनाचे महत्त्व
शिक्षक दिन केवळ एका व्यक्तीच्या जयंतीपुरता मर्यादित नसून शिक्षकांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो. शिक्षक समाजातील सर्वात महत्त्वाचा घटक आहेत. ते विद्यार्थ्यांचे केवळ ज्ञान वाढवत नाहीत तर त्यांच्या विचारांना दिशा देतात, चारित्र्य घडवतात आणि समाजात जबाबदार नागरिक घडवतात. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील यशामध्ये शिक्षकांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे हा दिवस विद्यार्थ्यांसाठी आपले गुरु आणि शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची सुवर्णसंधी असते.
शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विद्यार्थ्यांकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणं, नाटकं आणि कविता सादर केली जातात. काही ठिकाणी विद्यार्थी शिक्षकांच्या भूमिकेत वावरतात आणि वर्ग घेतात, जेणेकरून शिक्षकांना एका दिवसाची विश्रांती मिळेल. सरकारकडूनही या दिवशी शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षकांना राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
55
आजच्या काळातील शिक्षक दिनाचे महत्त्व
आजच्या तंत्रज्ञानप्रधान जगात शिक्षकांची भूमिका अधिक महत्वाची ठरते. इंटरनेट आणि डिजिटल साधनांनी ज्ञान मिळवणे सोपे झाले असले तरी विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवणे, मूल्यांचा बिंबवणे आणि जीवन कौशल्ये शिकवणे हे शिक्षकच करू शकतात. त्यामुळे शिक्षक दिन आपल्याला या सत्याची आठवण करून देतो की तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी शिक्षकाची जागा कोणी घेऊ शकत नाही.