
मुंबई : प्रत्येक घरात रोज डाळ लागतेच. डाळीशिवाय जेवण अपूर्ण वाटतं. तुम्ही भात, चपाती किंवा पुलाव काहीही बनवा, सोबत डाळ हवीच असते. भातासोबत लोक आवर्जून डाळ बनवतात. डाळीमध्ये भरपूर प्रोटीन असतं, ती चवीला छान लागते आणि आरोग्यासाठीही फायदेशीर असते. म्हणूनच आपण नेहमी डाळ बनवतो.
कुकरमध्ये डाळ शिजवताना एक मोठी कटकट होते. शिट्टीमधून पाणी, फेस आणि डाळ बाहेर येते. कुकरची शिट्टी झाली की उकळतं पाणी कुकरच्या झाकणावर आणि गॅसवर सांडतं. कुकरच्या आजूबाजूला शिजलेल्या डाळीचे कणही उडालेले दिसतात. असं का होतं? हे कसं थांबवायचं, असा प्रश्न अनेकांना पडतो. यावर आमच्याकडे एक सोपी ट्रिक आहे. तुम्ही ही पद्धत वापरली, तर इथून पुढे कुकरमधून डाळीचं पाणी अजिबात बाहेर येणार नाही.
भात किंवा डाळ शिजवताना फेस आणि पाणी बाहेर येणं खूप सामान्य आहे. कुकरमध्ये जागा कमी असेल, तर पाणी उकळतं आणि त्याचा फेस तयार होतो. कुकर क्षमतेपेक्षा जास्त भरणं, हे यामागचं मुख्य कारण आहे. शिजताना डाळ फुगते. त्यावर फेस जमा होतो आणि आतल्या प्रेशरमुळे तो कुकरच्या बाहेर फेकला जातो.
कुकरमधून पाणी, फेस किंवा डाळ बाहेर येऊ नये असं वाटत असेल, तर ही एक सोपी ट्रिक नक्की वापरून पाहा. तुम्ही कुकरमध्ये डाळ, पाणी, हळद आणि मीठ घातल्यावर त्यात फक्त चार-पाच थेंब तेल टाका. तुम्ही कुकरच्या झाकणावर शिट्टीच्या जागीही तीन-चार थेंब तेल लावू शकता. हे सगळं झाल्यावर कुकर गॅसवर ठेवा. तेलामुळे फेस जास्त वर येत नाही. यामुळे शिट्टी झाल्यावर डाळीचं पाणी बाहेर सांडत नाही.
तुम्ही कदाचित घरी छोटा कुकर वापरत असाल आणि त्यात खूप जास्त डाळ भरत असाल. असं करणं टाळा. यामुळे कुकरमध्ये पाणी आणि फेसासाठी पुरेशी जागा उरत नाही. परिणामी डाळ वर येते आणि शिट्टीवाटे बाहेर सांडते. तुम्ही कुकरमध्ये डाळ आणि पाणी भरण्यापूर्वी त्याची क्षमता नेहमी तपासा.
तुम्ही कुकरचं रबर किंवा शिट्टी नीट बसवली नसेल, तरीही पाणी, भात आणि डाळ बाहेर सांडते. गॅसकेट (रबर) सैल किंवा खराब झालं असेल, तर कुकरमध्ये प्रेशर तयार होत नाही. यामुळे शिट्टी होण्याआधीच पाणी आणि वाफ गळू लागते. तुम्हाला हा त्रास नेहमी होत असेल, तर आधी कुकरच्या रबरची अवस्था तपासा. ते पूर्णपणे खराब झालं असेल, तर लगेच बदलून घ्या. कुकर स्वच्छ ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही शिट्टी कुठेही ठेवली, तर त्यात धूळ किंवा कीटक अडकू शकतात. यामुळे शिट्टी नीट काम करत नाही.