Old Sarees : जुन्या साड्यांच्या बदल्यात भांडी घेताय? व्यापारी त्या साड्यांचं पुढे काय करतात?

Published : Oct 30, 2026, 01:22 PM IST

गल्लीबोळात किंवा सोसायटीमध्ये जुन्या साड्यांच्या बदल्यात पैसे, प्लास्टिक किंवा स्टीलची भांडी देणारे व्यापारी तुम्ही पाहिले असतील. आपण निरुपयोगी समजून देणाऱ्या या जुन्या साड्यांचं हे लोक पुढे काय करतात? जाणून घ्या या व्यवसायामागचं खरं गणित.

PREV
16
साड्यांचं काय करायचं?

आपल्या घरात वापरून झालेल्या किंवा कपाटात पडून राहिलेल्या जुन्या साड्यांचा मोठा खजिना असतो. काही साड्या फाटलेल्या असतात, काहींचा रंग उडालेला असतो, तर काही साड्यांची फॅशन गेल्यामुळे आपण त्या नेसत नाही. या साड्यांचं काय करायचं असा प्रश्न अनेकांना पडतो. म्हणूनच अनेक व्यापारी गल्लीबोळात किंवा गावांमध्ये जुन्या साड्या गोळा करायला येतात. काही लोक या साड्यांच्या बदल्यात रोख पैसे देतात, तर काही जण प्लास्टिकच्या बादल्या, स्टीलचे डबे किंवा भांडी देतात. पण हे व्यापारी या जुन्या साड्यांचं पुढे काय करतात? ते जाणून घेऊया.

26
तीन वेगळे भाग केले जातात

व्यापारी गोळा केलेल्या सर्व साड्या एकाच प्रकारे वापरत नाहीत. साडीचा दर्जा, प्रकार, रंग, फाटलेला भाग आणि जरीची गुणवत्ता पाहून ते साड्यांचे वर्गीकरण करतात. नेसण्यायोग्य साड्या, ऑल्टर करावयाच्या साड्या आणि पूर्णपणे खराब झालेल्या साड्या असे तीन वेगळे भाग केले जातात. या वर्गीकरणामुळे प्रत्येक साडीचा योग्य वापर करणे शक्य होते.

36
सेकंड हँड किंवा कमी दरात विक्री

काही जुन्या साड्या अगदी चांगल्या स्थितीत असतात. त्या महिलांनी फक्त एक-दोनदाच वापरलेल्या असतात. अशा साड्या ड्राय क्लीन करून, त्यावर थोडे फिनिशिंग काम करून व्यापारी त्या पुन्हा विक्रीसाठी बाजारात आणतात. सेकंड हँड कपड्यांच्या बाजारात किंवा कमी दरात कपडे शोधणाऱ्या ग्राहकांना या साड्या विकल्या जातात.

46
शिवणकामासाठी वापर

नेसण्यासाठी निरुपयोगी ठरलेल्या साड्यांपासून बॅग्स, कुशन कव्हर्स, लहान पिशव्या, पॅचवर्कच्या वस्तू आणि घराच्या सजावटीचे सामान बनवले जाते. चांगल्या दर्जाच्या पैठणी किंवा कांजीवरम साड्यांचे कापड इतर नवीन कपडे शिवण्यासाठी वापरतात. काही साड्यांचे तुकडे करून शिवणकामासाठी वापर केलेला दिसतो.

56
साड्यांच्या जरीमध्ये खरी चांदी आणि सोन्याचा मुलामा

जुन्या कांजीवरम किंवा बनारसी सिल्क साड्यांच्या जरीमध्ये खरी चांदी आणि सोन्याचा मुलामा वापरलेला असतो. काही पारंपरिक साड्यांच्या जरीतील चांदीच्या तारेवर सोन्याचा लेप असायचा. परंतु, सध्या बाजारात मिळणाऱ्या बहुतांश साड्यांमध्ये तांब्याची किंवा मेटल फिल्मची कृत्रिम जरी वापरतात.

66
रीसायकलिंगसाठी वापर

साडी पूर्णपणे फाटलेली असली तरी तिचे कापड वेगवेगळ्या कामांसाठी उपयोगी पडते. अशा साड्यांचे तुकडे करून ते गाड्या किंवा यंत्रे पुसण्याच्या कपड्यांसाठी (क्लीनिंग क्लॉथ) अथवा कापड रीसायकलिंगसाठी वापरतात. त्यामुळे घरातील जुन्या पैठणी किंवा सोन्या-चांदीची जरी असलेल्या साड्या मोडीत देण्यापूर्वी त्यांची खरी किंमत नक्की तपासा.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories