
Nag Panchami 2025 Puja Vidhi : नागपंचमी हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला साजरा केला जातो. यंदा नागपंचमी २९ जुलै रोजी साजरी होणार आहे. पंचमी तिथीची सुरूवात २८ जुलै रात्री ११:२५ पासून होईल आणि ती २९ जुलै दुपारी १२:४७ वाजेपर्यंत राहील. उदय तिथीनुसार नागपंचमीचा मुख्य दिवस २९ जुलैला मानला जाईल.
शुभ योगांचा संयोग
या वर्षी नागपंचमीच्या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत. त्यामध्ये शिव योग, रवि योग आणि लक्ष्मी योग यांचा समावेश आहे. हे योग पूजेसाठी अत्यंत फलदायी मानले जातात. याव्यतिरिक्त, २९ जुलै हा दिवस मंगळवार असल्यामुळे या दिवशी मंगळागौरी व्रत करण्याचाही विशेष संयोग आहे. या दिवशी मंत्रजप, व्रत, उपासना आणि पूजन केल्यास विशेष पुण्यप्राप्ती होते असे मानले जाते.
नागपंचमीचे धार्मिक महत्त्व
पौराणिक मान्यतेनुसार नागपंचमीच्या दिवशी नाग देवतेची पूजा केल्याने कालसर्प दोष निवारण होते. कुंडलीतील दोषांचे शमन होऊन मानसिक आणि पारिवारिक शांतता लाभते. नाग देवता ही संरक्षणाची आणि उर्जेची प्रतीक मानली गेली आहे. म्हणूनच या दिवशी नागदेवतेला दूध अर्पण करून भक्तीभावाने पूजन केले जाते. घरात सुख-समृद्धी, आरोग्य आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यासाठी नागपंचमीचे विशेष स्थान आहे.
नागपंचमी पूजन विधी
नागपंचमीच्या दिवशी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ वस्त्रे धारण करा.
घरात पूजेसाठी एक लाकडी पाटावर लाल कापड अंथरून नाग देवतेची मूर्ती किंवा पिठापासून तयार केलेले नागाचे रूप स्थापित करा.
दूध, पाणी, फुले, हळद, कुंकू, तांदूळ, मिठाई इत्यादी अर्पण करून “ॐ नागदेवाय नमः” या मंत्राचा जप करा.
पूजेनंतर नागपंचमीची पारंपरिक कथा ऐका किंवा वाचा.
पूजेनंतर नागदेवतेला दूध अर्पण करून दूधाचा अभिषेक करा आणि हात जोडून मन:पूर्वक क्षमा मागा.