Makar Sankranti 2024 Bornahan : येत्या 14 जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे. अशातच नवविवाहित जोडप्यांसाठी मकर संक्रांत अतिशय खास असते. तर लहान मुलांचे यावेळी बोरन्हाण केले जाते. पण बोरन्हाण का करतात माहितेय का?
Makar Sankranti 2024 Bornahan : इंग्रजी नववर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रात. येत्या 14 जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे. सक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे परिधान करुन हा सण साजरा केला जातो. या दिवशी नववधू आणि बाळाची पहिली संक्रांत अगदी उत्साहाने साजरी केली जाते. हलव्याचे दागिने घालून हा सण साजरा केला जातो. 'तिळ गूळ घ्या, गोड गोड बोला' असं म्हणतं सगळ्यांना तिळाचे लाडू आणि हलवा देऊन हा सण साजरा केला जातो.
संक्रांत म्हणजे संक्रमण, मार्ग क्रमून जाणे किंवा ओलांडून जाणे. तसं म्हटलं तर प्रत्येक महिन्यांतच संक्रांत येत असते. म्हणजेच सूर्याचे एका राशीतून दुसर्या राशीत संक्रमण अर्थात मार्गक्रमण होत असते. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा जी संक्रांत येते ती मकर संक्रांत. यावेळी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. दिवस हळू हळू मोठा होऊ लागतो.
नवविवाहितेसाठी पहिली संक्रात जशी महत्त्वाची आहे त्याचप्रमाणे पहिल्या संक्रांतीच्या निमित्ताने शिशुसंस्कार म्हणून बोरन्हाण करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. संक्रातीपासून रथसप्तमीपर्यंतच्या या काळात हे बोरन्हाण घातलं जातं. ज्या दिवशी बोरन्हाण करणार, त्या दिवशी बाळाला काळं झबलं आणि हलव्याचे दागिने घातले जातात. या कार्यक्रमासाठी बोलावलेल्या लहान लहान मुलांच्या मध्ये बसवून बाळाचं औक्षण केलं जातं. नंतर त्याच्या डोक्यावरून चुरमुरे, हलवा, बोरं, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, सुटे पैसे, चॉकलेट गोळ्या इ. एकत्र करून घातले जाते. जमलेल्या इतर मुलांनी हे सर्व पदार्थ वेचून घरी घेऊन जायचं असतं. घरी आलेल्या सुवासिनींना हळदीकुंकू दिलं जातं. बोरन्हाण घातल्यावर मुलाला पुढच्या उन्हाळ्याची बाधा होत नाही असा एक समज यामागे आहे. बोरन्हाणाच्या निमित्ताने बोरं, ऊस, हलवा हे पदार्थ मुलं खातात.नवीन पदार्थ किंवा नवी चव मुलांना कळते. बऱ्याच घरात मूल पाच वर्षाचं होईपर्यंत त्याचं बोरन्हाण केलं जाते. या निमित्ताने लहानमोठ्या सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळते. लहानमुलांबरोबर मोठी मंडळी पण आनंद साजरा करतात.
(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :
भोगीला आंघोळीच्या पाण्यात तीळ का घालतात? वाचा खास कारण
Bhogi 2025 निमित्त मित्रपरिवाराला मराठमोळ्या शुभेच्छा पाठवून साजरा करा सण