
Kitchen Safety Hacks : घरातून एलपीजी (LPG) चा दुर्गंध येणे ही अत्यंत गंभीर आणि जीवघेणी परिस्थिती असते. अशा वेळी घाबरून न जाता शांत राहून तात्काळ योग्य पावले उचलणे आवश्यक आहे. कारण एलपीजी गॅस अतिशय ज्वलनशील असतो आणि छोटीशी चूकही मोठ्या स्फोटाला कारणीभूत ठरू शकते. काहीवेळा लोक घाईगडबडीत किंवा चुकीच्या माहितीमुळे असे काही करतात जे जीवावर बेतू शकते. म्हणूनच घरात गॅसचा वास आला तर कोणत्या गोष्टी करू नयेत आणि नेमके कोणते उपाय करावेत, हे समजून घेणे अत्यावश्यक आहे.
घरात गॅसचा दुर्गंध आला की सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा—कुठल्याही परिस्थितीत लाईट, पंखा, एक्सॉस्ट, किंवा कोणताही इलेक्ट्रिक स्विच चालू किंवा बंद करू नका. अनेकजण वास घालवण्यासाठी पंखा किंवा एक्झॉस्ट फॅन सुरू करतात, पण हे अत्यंत धोकादायक असते. इलेक्ट्रिक स्विचमधून निर्माण होणारी छोटीशी स्पार्कदेखील मोठा स्फोट घडवू शकते. त्याचप्रमाणे मोबाईल फोन वापरणे, कॉल करणे, मॅचस्टिक किंवा लायटर पेटवणे टाळा. कारण हवेतील गॅसचे प्रमाण वाढलेले असते आणि एका छोट्याशा ज्वालेनेही आग लागण्याची शक्यता असते.
गॅसचा वास जाणवताच गॅस स्टोव्ह आणि सिलिंडरची व्हॉल्व्ह त्वरित बंद करा. त्यानंतर घरातील सर्व खिडक्या आणि दरवाजे मोठे करून उघडा, ज्यामुळे गॅस लवकर बाहेर जाईल. घरातील सर्व लोकांना सुरक्षित ठिकाणी बाहेर काढा आणि वातावरण शांत ठेवा. शक्य असल्यास शेजाऱ्यांनाही इशारा द्या. सिलिंडर जर जास्त गळत असेल तर त्याला स्पर्श करू नका तो स्वतः उचलणे किंवा हलवणे धोकादायक ठरू शकते. त्याऐवजी सुरक्षित अंतर ठेवून गॅस वितळण्यासाठी मार्ग मोकळा ठेवा.गॅस एजन्सी अथवा आपत्कालीन सेवा यांना कधी संपर्क करावा?
गॅस गळती थांबविण्यासाठी प्राथमिक उपाय केल्यानंतर तुमच्या गॅस वितरक एजन्सीच्या आपत्कालीन क्रमांकावर त्वरित संपर्क करा. शक्यतो घराबाहेर जाऊन फोन करा. एजन्सीचे तज्ञ त्वरित घरी येऊन गळतीचे नेमके कारण शोधतील आणि योग्य दुरुस्ती करतील. परिस्थिती गंभीर असल्यास 112 किंवा अग्निशमन दलालाही कॉल करू शकता.
घरात गॅसचा वास येण्याची काही सामान्य कारणे म्हणजे जुनी किंवा निकृष्ट दर्जाची गॅस पाईप, सिलिंडरची व्हॉल्व्ह सैल होणे, रेग्युलेटर खराब असणे, किंवा स्टोव्हच्या नॉबमध्ये बिघाड. यासाठी दर ६ महिन्यांनी गॅस पाइप तपासणे, रेग्युलेटरची मुदत तपासणे आणि आवश्यक तेव्हा भाग बदलणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वयंपाक करताना गॅस स्टोव्हजवळ प्लास्टिक, पेपर किंवा कपडे ठेवू नका. तसेच, सिलिंडर स्वयंपाकघरातील बंद कपाटात ठेवू नये नेहमी हवेशीर जागेत ठेवा.
लहानशी बेपर्वाई मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकते. म्हणून गॅसचा वास येताच शांतपणे पण झटपट आणि योग्य पद्धतीने कृती करणे गरजेचे आहे. सुरक्षितता ही सवयीने येते—स्वयंपाकघरात गॅस वापरताना नेहमी जागरूक राहा. योग्य जागी, योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी केलेली कृती आपले आणि घरच्यांचे प्राण वाचवू शकते.