Kitchen Gardening: जागेचं टेन्शन विसरा, बाल्कनीतल्या कुंडीतच असं पिकवा ताजं कारलं

vivek panmand   | CMS
Published : Sep 24, 2026, 08:34 PM IST
Kitchen Gardening: जागेचं टेन्शन विसरा, बाल्कनीतल्या कुंडीतच असं पिकवा ताजं कारलं

सार

घरच्या घरी कारलं लावण्यासाठी मोठ्या जागेची गरज नाही. बाल्कनी किंवा टेरेसवर एका कुंडीतही तुम्ही कारल्याचा वेल लावू शकता. योग्य माती, सूर्यप्रकाश, पाणी, खत आणि वेलीला चांगला आधार दिला, तर घरच्या घरी ताजं कारलं सहज पिकवता येतं.

कुंडीत कारलं लावण्यासाठी एवढंच करा!

घराच्या टेरेसवर किंवा बाल्कनीत स्वतःच्या हाताने भाजीपाला पिकवण्याचा आनंद काही औरच असतो, नाही का? रोपाला लागलेली छोटी छोटी फळं पाहिली की मनाला खूप समाधान मिळतं. त्यात जर घरच्या घरी ताज्या भाज्या मिळत असतील, तर आणखी काय हवं! तुम्हाला जर किचन गार्डनिंगची आवड असेल, तर तुम्ही कुंडीतही कारलं अगदी सहज पिकवू शकता. ते कसं, ते आज आपण पाहूया.

कारल्यासाठी कुंडी कशी असावी?

कारल्याचा वेल खूप वेगाने वाढतो. त्यामुळे खूप छोटी कुंडी वापरणं टाळा. साधारण १५ ते १८ इंच खोल आणि रुंद असलेली कुंडी यासाठी एकदम योग्य ठरते. कुंडीतलं जास्तीचं पाणी बाहेर जाण्यासाठी तिच्या तळाला पुरेशी छिद्रं असली पाहिजेत. मातीत पाणी साचून राहिलं, तर मुळांचं नुकसान होऊ शकतं. या रोपाला रोज साधारण ६ ते ८ तास सूर्यप्रकाश मिळणं गरजेचं आहे. कारल्याच्या वेलीला उबदार हवामान आणि भरपूर ऊन लागतं.

माती तयार करण्याची सोपी पद्धत

कारल्यासाठी खूप घट्ट माती चालत नाही. बागेतली माती, कंपोस्ट खत आणि कोकोपीट समप्रमाणात मिसळून एक हलकं मिश्रण तयार करा. यामुळे रोपाला आवश्यक पोषक घटक मिळतात, ओलावा टिकून राहतो आणि जास्तीचं पाणी सहज वाहून जातं. माती जर खूप चिकट असेल, तर त्यात तुम्ही थोडी वाळूही मिसळू शकता.

बिया पेरण्यापूर्वी हे नक्की करा

बियाणे दुकानातून किंवा नर्सरीतून कारल्याच्या चांगल्या दर्जाच्या बिया आणा. या बियांचं आवरण थोडं कडक असतं, त्यामुळे पेरण्यापूर्वी त्या काही तास पाण्यात भिजत ठेवा. यामुळे बियांना लवकर मोड यायला मदत होते. तयार केलेल्या मातीत साधारण एक इंच खोल खड्डा करून त्यात २ ते ३ बिया टाका. वरून हलक्या हाताने माती झाका आणि थोडं पाणी शिंपडा.

७ ते १० दिवसांत येईल मोड!

कुंडी अशा ठिकाणी ठेवा जिथे चांगली ऊब आणि प्रकाश मिळेल. योग्य वातावरण मिळाल्यास साधारण ७ ते १० दिवसांत बियांना मोड येतात. रोप थोडं मोठं झाल्यावर आणि त्याला काही पानं आल्यावर, जे रोप सर्वात निरोगी आणि मजबूत वाटेल तेवढंच ठेवा. कमकुवत रोपे तुम्ही काढून टाकू शकता.

वेलीला भक्कम आधार देणं गरजेचं

कारलं ही वेलवर्गीय भाजी आहे. जसजसं रोप वाढेल, तसतसा त्याला जाळी, लाकडी काठी किंवा एखाद्या भक्कम गोष्टीचा आधार देणं आवश्यक आहे. वेलीला जमिनीवर पसरू देण्याऐवजी वरच्या दिशेने वाढू द्या. यामुळे जागाही कमी लागते आणि वेलीची काळजी घेणंही सोपं जातं.

पाणी आणि खताचं नियोजन

कारल्याच्या रोपाला पाणी देण्यापूर्वी मातीतला ओलावा नक्की तपासा. वरची माती सुकलेली दिसली तरच पाणी द्या. पावसाळ्यात कुंडीत पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. रोप वाढीच्या टप्प्यात असताना तुम्ही थोड्या प्रमाणात कंपोस्ट किंवा सेंद्रिय खत देऊ शकता. गरजेनुसार साधारण १५ ते २० दिवसांतून एकदा खत दिल्यास रोपाला चांगले पोषक घटक मिळतात. पानांच्या खालच्या बाजूला कीड, पांढरे डाग किंवा चिकट पदार्थ दिसल्यास रोपाची लगेच तपासणी करा.

फुलं आल्यावर काय करावं?

कारल्याच्या वेलीवर नर आणि मादी अशी दोन्ही प्रकारची फुलं वेगवेगळी येतात. जर आजूबाजूला मधमाश्या किंवा परागीभवन करणारे इतर कीटक कमी असतील, तर तुम्ही सकाळी स्वतःच्या हाताने (हँड पॉलिनेशन) परागीभवन करू शकता. यामुळे फळ लागण्याच्या प्रक्रियेला चांगली मदत होते.

यानंतर कारली तयार व्हायला सुरुवात होईल. ती योग्य आकाराची झाल्यावर लगेच तोडून घ्या, ती खूप मोठी किंवा जुनी होईपर्यंत वेलीवरच ठेवू नका.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Kitchen Gardening: जागेचं टेन्शन विसरा, बाल्कनीतल्या कुंडीतच अशी वाढवा कारल्याची वेल
Hair Growth : केस गळतीमुळे टेन्शन आलंय? रोज हे एक तेल लावा, केस गळणं थांबेल