
घरच्या टेरेसवर किंवा बाल्कनीत स्वतःच्या हाताने भाज्या पिकवण्याचा आनंद काही औरच असतो, नाही का? वेलीवर लागलेली छोटी छोटी फळं पाहिली की मनाला खूप समाधान मिळतं. त्यात घरची ताजी भाजी खायला मिळाली तर अजून काय हवं! तुम्हाला जर किचन गार्डनिंगची आवड असेल, तर तुम्ही कुंडीतही अगदी सहज कारली पिकवू शकता. ते कसं, चला पाहूया.
कारल्याची वेल खूप वेगाने वाढते. त्यामुळे खूप छोटी कुंडी वापरू नका. साधारण १५ ते १८ इंच खोल आणि रुंद असलेली कुंडी यासाठी एकदम योग्य राहील. कुंडीच्या तळाशी पाणी जाण्यासाठी पुरेसे छिद्र (होल्स) असणं खूप गरजेचं आहे. मातीत पाणी साचून राहिलं तर मुळांचं नुकसान होऊ शकतं. या रोपाला रोज साधारण ६ ते ८ तास ऊन मिळायला हवं. कारल्याच्या वेलीला उबदार हवामान आणि भरपूर सूर्यप्रकाश लागतो.
माती तयार करण्याची सोपी पद्धत
कारल्यासाठी खूप घट्ट माती चालत नाही. बागेतली माती, कंपोस्ट खत आणि कोकोपीट समप्रमाणात मिसळून हलकी माती तयार करा. यामुळे रोपाला पोषण तर मिळतंच, शिवाय ओलावा टिकून राहतो आणि जास्तीचं पाणी वाहून जायला मदत होते. माती खूप चिकट असेल तर त्यात थोडी वाळू मिसळा.
बी पेरण्यापूर्वी हे नक्की करा
चांगल्या दर्जाची कारल्याची बियाणे एखाद्या सीड स्टोअर किंवा नर्सरीतून आणा. बियांचं वरचं आवरण थोडं कडक असतं, त्यामुळे पेरण्यापूर्वी त्या काही तास पाण्यात भिजत ठेवा. यामुळे बिया लवकर रुजायला मदत होते. तयार केलेल्या मातीत साधारण एक इंच खोल खड्डा करून त्यात २ ते ३ बिया टाका. वरून हलकी माती झाका आणि थोडं पाणी द्या.
७ ते १० दिवसांत येईल मोड!
कुंडी अशा जागी ठेवा जिथे ऊन आणि उबदारपणा मिळेल. योग्य वातावरण मिळाल्यास साधारण ७ ते १० दिवसांत बियांना मोड येतात. रोप थोडं मोठं झाल्यावर आणि त्याला काही पानं आल्यावर, जे रोप सर्वात निरोगी आणि मजबूत वाटेल तेच ठेवा. कमकुवत रोपे काढून टाका.
वेलीला भक्कम आधार देणं महत्त्वाचं
कारले ही एक वेलवर्गीय भाजी आहे. जशी वेल वाढू लागेल, तसा तिला जाळी, लाकडी काठी किंवा एखाद्या भक्कम गोष्टीचा आधार द्या. वेल जमिनीवर पसरवण्याऐवजी वरच्या दिशेने वाढू द्या. यामुळे जागाही कमी लागते आणि वेलीची काळजी घेणंही सोपं जातं.
पाणी आणि खताची अशी घ्या काळजी
कारल्याच्या रोपाला पाणी देण्यापूर्वी मातीतला ओलावा नक्की तपासा. वरची माती सुकलेली दिसली तरच पाणी द्या. पावसाळ्यात कुंडीत पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. वेल वाढीच्या काळात तुम्ही थोड्या प्रमाणात कंपोस्ट किंवा सेंद्रिय खत देऊ शकता. गरजेनुसार साधारण १५ ते २० दिवसांतून एकदा खत दिल्यास रोपाला चांगलं पोषण मिळतं. पानांच्या खालच्या बाजूला कीड, पांढरे डाग किंवा चिकट पदार्थ दिसल्यास रोपाची लगेच तपासणी करा.
फुले आल्यावर काय करावं?
कारल्याच्या वेलीवर नर आणि मादी अशी दोन्ही प्रकारची फुले वेगवेगळी येतात. जर आजूबाजूला मधमाश्या किंवा परागीभवन (Pollination) करणारे कीटक कमी असतील, तर तुम्ही सकाळी हातानेही परागीभवन करू शकता. यामुळे फळ लागण्याच्या प्रक्रियेला मदत होते.
त्यानंतर कारली लागायला सुरुवात होईल. ती योग्य आकाराची झाल्यावर लगेच तोडून घ्या, ती खूप मोठी किंवा जुनी होईपर्यंत वेलीवरच ठेवू नका.