
Health Care : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे पाय आणि कंबरदुखीची समस्या अनेकांना भेडसावत आहे. ऑफिसमध्ये तासन्तास बसून काम करणे, मोबाईलचा जास्त वापर, व्यायामाचा अभाव आणि चुकीची शरीरस्थिती यामुळे ही समस्या अधिक गंभीर होत जाते. सुरुवातीला हलकी वाटणारी वेदना पुढे जाऊन मोठ्या आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकते. अशा परिस्थितीत नियमित योगाभ्यास हा अत्यंत प्रभावी उपाय ठरू शकतो. काही विशिष्ट योगासने केल्याने स्नायू मजबूत होतात, शरीरातील ताण कमी होतो आणि पाय व कंबरदुखीपासून नैसर्गिकरित्या आराम मिळतो.
भुजंगासन हे कंबरदुखीसाठी अत्यंत फायदेशीर योगासन मानले जाते. या आसनात पोटावर झोपून शरीराचा वरचा भाग हळूहळू वर उचलला जातो. यामुळे कंबरेच्या स्नायूंवर ताण येतो आणि ते मजबूत होतात. तसेच मणक्याची लवचिकता वाढते. रोज ८ ते १० वेळा हे आसन केल्यास कंबरदुखी कमी होण्यास मदत होते.
मकरासन हे शरीराला विश्रांती देणारे आणि कंबरदुखी कमी करणारे प्रभावी आसन आहे. या आसनात पोटावर झोपून शरीर पूर्णपणे सैल ठेवले जाते. यामुळे कंबर आणि पाठीच्या स्नायूंना आराम मिळतो. दीर्घकाळ बसून काम करणाऱ्यांसाठी हे आसन विशेष उपयुक्त ठरते.
पवनमुक्तासन केल्याने पोट, कंबर आणि पाय यांवरील ताण कमी होतो. या आसनात पाठ टेकून झोपून गुडघे छातीकडे ओढले जातात. यामुळे कंबरेचा भाग मजबूत होतो तसेच पायातील ताणही कमी होतो. पचनक्रियाही सुधारण्यास मदत होते.
सेतूबंधासन हे कंबर आणि पायांच्या स्नायूंना बळकटी देणारे आसन आहे. या आसनात पाठ टेकून झोपून कंबर हळूहळू वर उचलली जाते. यामुळे मणक्याला योग्य ताण मिळतो आणि कंबरदुखी कमी होण्यास मदत होते. नियमित सराव केल्यास शरीर अधिक लवचिक होते.
ताडासन हे दिसायला सोपे असले तरी अत्यंत प्रभावी योगासन आहे. या आसनात सरळ उभे राहून शरीर ताणले जाते. यामुळे पाय, कंबर आणि मणक्याचे स्नायू मजबूत होतात. शरीराची पोश्चर सुधारते आणि दीर्घकाळ उभे राहिल्यानंतर किंवा बसल्यानंतर होणारी वेदना कमी होते.
योगासने केवळ वेदना कमी करण्यासाठीच नव्हे तर संपूर्ण आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. नियमित योगाभ्यास केल्याने रक्ताभिसरण सुधारते, शरीरातील ताण कमी होतो आणि स्नायूंना लवचिकता मिळते. त्यामुळे पाय व कंबरदुखीचा त्रास कमी होतो. मात्र कोणतेही आसन करताना योग्य पद्धत पाळणे आणि गरज असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)