अनेकांना वाटतं की केक बनवण्यासाठी ओव्हन, व्हॅनिला इसेन्स, व्हिनेगर, कोको पावडर किंवा अंडी लागतातच. पण या सगळ्या झंझटशिवाय, रोजच्या वापरातलं दूध, दही, साखर आणि रवा वापरून तुम्ही बेकरीपेक्षाही भारी आणि मऊ स्पॉंजी रवा केक (Eggless Suji/Rava Cake) फक्त ३० मिनिटांत पातेल्यात बनवू शकता. मग वाट कसली बघताय? उत्तर कर्नाटक स्टाईलचा हा सिम्पल रवा केक कसा बनवायचा ते पाहूया.
रवा (उपमा रवा/मिडीयम रवा): १ कप
साखर: ३/४ कप (पाऊण कप)
दही: ३/४ कप
दूध: ३/४ कप (उकळून थंड केलेलं)
मैदा: १/२ कप
खाण्याचं तेल: २-३ मोठे चमचे
मीठ: १ चिमूटभर
बेकिंग पावडर: १ चमचा
खाण्याचा सोडा (बेकिंग सोडा): १/२ चमचा
टुटी फ्रुटी: थोडीशी (आवडत असल्यास)
रवा आणि साखर वाटून घ्या
तुम्ही सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात १ कप रवा आणि ३/४ कप साखर टाकून त्याची बारीक पावडर करून घ्या. (पिठीसाखर वापरण्यापेक्षा रव्यासोबतच साखर वाटून घेणं जास्त चांगलं).
बॅटर तयार करा
आता त्याच मिक्सरच्या भांड्यात पाऊण कप दही, अर्धा कप मैदा, पाऊण कप दूध आणि २-३ चमचे तेल टाका. झाकण लावून हे सगळं एकदम मऊ वाटून घ्या. त्यानंतर हे मिश्रण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्या.
सोडा आणि बेकिंग पावडर टाका
या मिश्रणात १ चिमूटभर मीठ, १ चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाका. हे सगळं एकाच दिशेने फिरवत चांगलं मिक्स करा. त्यानंतर लहान मुलांना आवडेल तशी थोडी टुटी फ्रुटी टाकून पुन्हा हलवून घ्या.
केक ट्रे तयार करा
केक ट्रे किंवा एखाद्या सपाट स्टीलच्या पातेल्याला थोडं तेल लावून घ्या. त्यात बटर पेपर ठेवा (बटर पेपर नसेल तर फक्त तेल लावलं तरी चालेल). तयार केलेलं बॅटर या पातेल्यात ओता. लक्षात ठेवा, पातेलं फक्त अर्धंच भरायचं आहे, कारण केक शिजताना फुगून वर येतो. वरून थोडी टुटी फ्रुटी भुरभुरा आणि पातेलं हलक्या हाताने टॅप करा.
ओव्हनशिवाय पातेल्यात बेक करा
गॅसवर एक जाड बुडाचं पातेलं किंवा कुकर ठेवून ४-५ मिनिटे गरम करून घ्या (यात पाणी किंवा मीठ टाकायची गरज नाही). पातेलं गरम झाल्यावर केकचा ट्रे थेट आत ठेवा. त्यावर झाकण ठेवून बारीक गॅसवर ३० मिनिटे केक शिजू द्या.
केक शिजलाय का ते तपासा
३० मिनिटांनंतर झाकण काढा. एक चाकू किंवा टूथपिक केकच्या मध्यभागी खुपसून बघा. चाकूला पीठ चिकटलं नाही, तर तुमचा केक पूर्णपणे शिजलाय असं समजा. गॅस बंद करा आणि केकला १० मिनिटे थंड होऊ द्या. त्यानंतर एका प्लेटमध्ये उलटा करून त्याचे पीस करा. तुमचा कापसासारखा मऊ आणि सुपर स्पॉंजी रवा केक खाण्यासाठी तयार आहे!