
मुंबई : लहान मुलांना भाज्या खाऊ घालणं म्हणजे पालकांसाठी रोजचीच डोकेदुखी. भाज्यांचं नाव काढलं की मुलं जेवणाला कंटाळतात. पण एका आईने केलेला भन्नाट प्रयोग सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. या आईने चक्क दुधी भोपळ्याचा वापर करून 'चप्पल'च्या आकाराची भजी (पकोडे) बनवली आहेत. एरवी दुधी भोपळ्याची भाजी किंवा ज्यूस पाहिला की मुलं पळ काढतात. पण या आईने दुधी भोपळ्याला चपलेचा आकार दिला आणि त्याची भजी तळून मुलांसमोर ठेवली. हुबेहूब लहान मुलांच्या चपलेसारखा दिसणारा हा स्नॅक सध्या नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरलाय.
दुधी भोपळ्याची चप्पल भजी!
हेतल नावाच्या एका फेसबुक युजरने हा हटके रेसिपीचा व्हिडीओ शेअर केलाय. यात आधी दुधी भोपळ्याचे छोटे तुकडे केले जातात. त्यानंतर चपलेच्या आकाराचं एक पेपर कटआऊट भोपळ्याच्या तुकड्यावर ठेवून तसाच आकार कापला जातो. पुढे टूथपिक आणि भोपळ्याच्या सालाचा वापर करून चपलेचे पट्टे (स्ट्रॅप्स) बनवले आहेत.
बेसनमध्ये बुडवून डीप फ्राय
चपलेचा आकार दिलेल्या या दुधी भोपळ्याच्या तुकड्यांना नंतर बेसनाच्या पिठात बुडवलं जातं. बेसनात मसाले आणि पाणी घालून भज्यांचं पीठ तयार केलंय. त्यानंतर या 'दुधीच्या चपला' गरम तेलात सोडून सोनेरी रंग येईपर्यंत कुरकुरीत तळल्या जातात. तळून झाल्यावर एका प्लेटमध्ये केचपसोबत त्या सर्व्ह केल्या आहेत. दिसायला अगदी छोट्या चपलांसारखी दिसणारी ही भजी मुलांना नक्कीच आकर्षित करतील अशी आहेत.
मुलांना भाज्या खाऊ घालण्याची नवी ट्रिक!
मुलांना दुधी भोपळ्यासारख्या भाज्या खायला नको असतात. पण जर त्यांना अशा आकर्षक आकारात पदार्थ दिले, तर ते आवडीने खातील, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
एरवी भाज्यांना नाक मुरडणाऱ्या मुलांनाही हा क्रिएटीव्ह पदार्थ नक्कीच आवडेल, असं अनेकांचं म्हणणं आहे.
नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केलीये. काहींनी या आईच्या क्रिएटीव्हिटीचं कौतुक केलंय, तर काहींनी "खाण्याच्या पदार्थाला चपलेचा आकार का?" असा गमतीशीर सवाल केलाय. एका युजरने म्हटलंय की, मुलांना दुधी भोपळा खाऊ घालण्याची ही एकदम भारी आयडिया आहे. तर दुसऱ्या एकाने मजेत कमेंट केलीये, "बहुतेक चपला खाण्याची इच्छा जास्तच वाढलीये असं दिसतंय!" एकंदरीत, साध्या दुधी भोपळ्याला एका वेगळ्याच अंदाजात सादर करून मुलांच्या आवडीचं बनवण्याची ही 'चप्पल भजी' आयडिया सध्या सोशल मीडियावर चांगलीच हिट ठरतेय.