घरात भात उरलाय का? मग तो फेकून देऊ नका. याच उरलेल्या भातापासून तुम्ही घरच्या घरी कुरकुरीत आणि चविष्ट बोंडे बनवू शकता. कमी साहित्यात आणि कमी वेळेत होणारे हे क्रिस्पी राईस बोंडे कसे बनवायचे, ते पाहूया.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच हे राईस बोंडे आवडीने खातात. चला तर, हे बोंडे सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते पाहूया. **लागणारे साहित्य** राईस बोंडे बनवण्यासाठी उरलेला भात, बेसन, थोडं तांदळाचं पीठ, चिरलेला कांदा, हिरवी मिरची, आलं, कढीपत्ता आणि कोथिंबीर पुरेशी आहे. चवीनुसार मीठ, तिखट किंवा काळीमिरी पूड वापरू शकता. थोडी बडीशेप टाकल्यास स्वाद आणि सुगंध दोन्ही छान येतो.
24
तयार करण्याची पद्धत
सगळ्यात आधी, उरलेला भात हाताने चांगला मॅश करून घ्या. त्यात बेसन, तांदळाचं पीठ, कांदा, हिरवी मिरची, आलं, कढीपत्ता, कोथिंबीर आणि मीठ घालून सर्व साहित्य एकत्र करा. भातामध्ये ओलावा असल्यामुळे जास्त पाणी घालू नका. पीठ घट्टसर गोळा होईल इतपतच ठेवा. पीठ पातळ वाटल्यास त्यात थोडं बेसन घालू शकता.
34
कुरकुरीत बोंड्यांसाठी खास टिप्स
बोंडे कुरकुरीत होण्यासाठी त्यात तांदळाचं पीठ नक्की घाला. तेल मध्यम आचेवर गरम करा. तेल जास्त गरम झाल्यास बोंडे वरून करपतील आणि आतून कच्चे राहतील. तेल कमी गरम असल्यास बोंडे तेल जास्त शोषून घेतील. म्हणून, मध्यम आचेवर छोटे गोळे सोडून ते सोनेरी होईपर्यंत तळा. **या चटणीसोबत खा** हे गरमागरम राईस बोंडे तुम्ही खोबऱ्याची चटणी, पुदिन्याची चटणी किंवा तिखट टोमॅटो चटणीसोबत खाऊ शकता. चटणी नसेल तर टोमॅटो सॉससोबतही हे छान लागतात. संध्याकाळच्या चहा किंवा कॉफीसोबत तर हे बोंडे एकदम बेस्ट लागतात.
मुलांना रोज तोच नाश्ता देण्याऐवजी, उरलेल्या भातापासून तुम्ही हा वेगळा पदार्थ बनवून देऊ शकता. मुलांसाठी बनवताना तिखट कमी वापरा आणि त्यांच्या आवडीच्या भाज्याही त्यात घालू शकता. मोठ्यांसाठीही संध्याकाळच्या चहासोबत हा एक उत्तम पर्याय आहे. हे बोंडे बनवायला जास्त खर्च येत नाही आणि उरलेला भातही वाया जात नाही. पुढच्या वेळी भात उरल्यास तो फेकून न देता हे कुरकुरीत बोंडे नक्की करून बघा.