सहसा कोणी आपला अपमान केला की आपल्याला राग येतो. आपली किंमत त्यांना दाखवून द्यावीशी वाटते. पण चाणक्य नीतीनुसार, एक हुशार माणूस प्रत्येक अपमानाचं उत्तर शब्दांनी देत नाही. मग तो काय करतो? अशा लोकांशी कसं वागायचं, ते आपण पाहूया.
आपल्या आयुष्यात काही लोक आपला आदर करतात, तर काही लोक आपल्याला कमी लेखतात. अनेकदा ते मुद्दाम आपला अपमान करतात किंवा आपल्या चांगुलपणाला आपला कमकुवतपणा समजतात. अशा वेळी रागाने लगेच प्रतिक्रिया देण्यापेक्षा त्यांच्याशी कसं वागायचं, याबद्दल आचार्य चाणक्य काय सांगतात ते आपण जाणून घेऊया.
25
स्वतःची किंमत ओळखा
समोरच्याने तुम्हाला कमी लेखलं म्हणजे तुमची क्षमता कमी होत नाही. एखाद्याच्या बोलण्यावरून स्वतःबद्दल वाईट विचार करणं चुकीचं आहे. चाणक्य नीतीमध्ये आत्मविश्वास आणि आत्मनियंत्रणाला खूप महत्त्व दिलं आहे. त्यामुळे अपमानाला अपमानाने उत्तर देण्यापेक्षा परिस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याची गरज नसते, हे समजणंही एक प्रकारचं शहाणपणच आहे.
35
स्वतःच्या मर्यादा स्पष्ट करा
जर कोणी तुमचा वारंवार अपमान करत असेल, तर ते सहन करत राहणं हा चांगुलपणा नाही. गरज पडेल तेव्हा शांतपणे पण स्पष्टपणे तुमचं मत मांडा. "मला तुमचं असं बोलणं आवडलं नाही" हे तुम्ही रागाशिवायही सांगू शकता. स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी प्रत्येक नातं टिकवणं गरजेचं नसतं. आपली मानसिक शांतता भंग करणाऱ्या लोकांपासून योग्य अंतर ठेवणंच शहाणपणाचं ठरतं.
आपला आदर न करणारे लोक आपल्या भावनांचा वापर आपल्याच विरोधात करू शकतात. म्हणूनच प्रत्येक गोष्ट सर्वांना सांगण्यापेक्षा कोणावर किती विश्वास ठेवायचा हे आपल्याला समजलं पाहिजे. आपल्या खाजगी गोष्टी, भीती, समस्या आणि भविष्यातील योजना कोणालाही सांगू नका.
55
कामातून उत्तर द्या
जेव्हा कोणी आपल्याला कमी लेखतं, तेव्हा आपलं उत्तर शब्दांतून नाही तर कामातून दिसलं पाहिजे. टीकेला उत्तर देऊन वेळ वाया घालवण्यापेक्षा आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणं फायद्याचं ठरतं. आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी प्रत्येकाशी वाद घालण्याची गरज नाही. तुमचं काम, मेहनत आणि यशच तुमच्याबद्दल बोलेल. पण प्रत्येक टीकेला अपमान समजणंही चुकीचं आहे. कधीकधी त्यात आपल्या फायद्याचा सल्लाही असू शकतो. त्यामुळे समोरच्याचं बोलणं पूर्णपणे नाकारण्यापूर्वी त्यात किती तथ्य आहे, हे तपासून पाहणं चांगलं, असं चाणक्य नीती सांगते.