रोज आंघोळ करणं आरोग्यासाठी चांगलं असतं. पण रोज संपूर्ण अंगाला साबण लावून आंघोळ करण्याची गरज नसते, असं त्वचाविकार तज्ज्ञ सांगतात. रोज साबण लावल्याने त्वचा कोरडी पडते आणि खाज येऊ शकते.
रोज आंघोळ केल्याने शरीर ताजतवानं राहतं. पण आपण कशी आंघोळ करतो, याचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर होतो. रोज संपूर्ण अंगाला साबण लावून घासल्याने त्वचेला फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होतं, असा इशारा त्वचाविकार तज्ज्ञ देतात.
आंध्र प्रदेशच्या त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. नीलिमा आणि इतर तज्ज्ञांनी याबद्दल काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. आपण त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
25
रोज संपूर्ण अंगाला साबण लावणं गरजेचं आहे का?
स्वच्छतेसाठी दिवसातून एकदा आंघोळ करणं पुरेसं असतं. पण हा नियम सर्वांना लागू होत नाही. तुम्ही राहता त्या ठिकाणचं हवामान, तुमचं काम, येणारा घाम आणि तुमची त्वचा (कोरडी किंवा तेलकट) यावर आंघोळीची पद्धत अवलंबून असते.
डॉ. नीलिमा सांगतात की, तुम्ही दिवसभर घरातच आराम करत असाल किंवा तुम्हाला जास्त घाम येत नसेल, तर संपूर्ण अंगाला साबण लावून आंघोळ करण्याची अजिबात गरज नाही.
35
शरीराचे कोणते भाग साबणाने स्वच्छ करावेत?
संपूर्ण अंगाला साबण लावण्याची गरज नसली, तरी शरीराचे काही भाग स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे. चेहरा, काखा, तळपाय आणि जांघेत जास्त घाम आणि तेलकटपणा जमा होतो. काखा आणि जांघेत जास्त वेळ ओलावा राहिल्याने तिथे बॅक्टेरिया वाढतात आणि दुर्गंधी येते. त्यामुळे हे भाग पाणी आणि योग्य साबणाने नियमित स्वच्छ केले पाहिजेत.
रोज भरपूर साबण लावल्याने शरीर एकदम स्वच्छ होतं, हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. साबणाचा सतत आणि जास्त वापर केल्याने त्वचेतला नैसर्गिक ओलावा आणि तेल निघून जातं. यामुळे त्वचा खूप कोरडी पडते आणि ताणली जाते.
यामुळे त्वचेला भयंकर खाज किंवा जळजळ होऊ शकते. तसेच, जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचा आणखी कोरडी पडण्याचा धोका वाढतो.
55
आंघोळीनंतर घ्यायची काळजी
आंघोळ झाल्यावरही त्वचेची काळजी घेण्यासाठी काही सोप्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. आंघोळीनंतर टॉवेलने अंग जोरात घासू नका. टॉवेलने हलकेच टिपून (Pat dry) अंग पुसणं केव्हाही चांगलं. त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि कोरडेपणा टाळण्यासाठी तुम्ही लगेच सुगंध नसलेलं मॉइश्चरायझर (Moisturizer) लावू शकता.
थोडक्यात सांगायचं तर, रोज आंघोळ करणं चांगलं असलं तरी रोज संपूर्ण अंगाला साबण लावणं सक्तीचं नाही. तुमची जीवनशैली, हवामान, घाम आणि त्वचेचा प्रकार ओळखून आंघोळीची सवय लावली, तर त्वचा दीर्घकाळ निरोगी राहील.