सोशल मीडियावर एक नवीन जुगाड व्हायरल होतोय. वॉशिंग मशीनमध्ये ॲल्युमिनियम फॉइलचा गोळा टाकल्यास कपडे मऊ होतात आणि वीज बिलही कमी येतं, असा दावा केला जातोय. पण या हॅकमध्ये खरंच तथ्य आहे का?
स्वयंपाकघरात जेवण गरम ठेवण्यासाठी किंवा पॅक करण्यासाठी वापरली जाणारी 'ॲल्युमिनियम फॉइल' (Aluminium Foil) आता वॉशिंग मशीनमध्ये पोहोचली आहे! टिकटॉक, इन्स्टाग्रामवर एक नवीन लाँड्री हॅक जबरदस्त व्हायरल होत आहे. यानुसार, कपडे धुताना वॉशिंग मशीनच्या ड्रममध्ये ॲल्युमिनियम फॉइलचे छोटे गोळे (Balls) टाकल्यास कपडे मऊ होतात, वीज बिल कमी येते आणि कपडे एकमेकांना चिकटत नाहीत, असा दावा केला जातोय. पण ही ट्रिक खरंच काम करते का? यामागे नेमकं काय विज्ञान आहे?
25
फॉइलचा गोळा नेमकं काय काम करतो?
पॉलिस्टर, नायलॉनसारखे सिंथेटिक कपडे एकत्र धुतल्यावर त्यांच्यात घर्षणामुळे स्थिर वीज (Static Electricity) तयार होते. यामुळे कपडे एकमेकांना चिकटतात, केसांसारखे धागे (Lint) खेचून घेतात आणि घडी घालताना 'चटपट' असा आवाज येतो. ॲल्युमिनियम विजेचा उत्तम वाहक (Good conductor of electricity) आहे. त्यामुळे, फॉइलचा गोळा मशीनमध्ये फिरताना ही स्थिर वीज शोषून घेतो (Discharge करतो) आणि कपड्यांना एकमेकांना चिकटण्यापासून रोखतो, असा या हॅकमागचा तर्क आहे.
35
हा हॅक वापरायचा कसा?
हा हॅक कसा वापरायचा याची पद्धत अशी सांगितली जाते - स्वयंपाकात वापरली जाणारी सामान्य ॲल्युमिनियम फॉइल घेऊन त्याचा टेनिस बॉलच्या आकाराचा (5 ते 7 सेमी) घट्ट गोळा बनवा. या गोळ्याचा पृष्ठभाग गुळगुळीत असावा, त्याला टोकदार कडा नसाव्यात. कपडे टाकण्यापूर्वी रिकाम्या ड्रममध्ये 1 ते 3 गोळे टाका. त्यानंतर कपडे आणि डिटर्जंट टाकून मशीन सुरू करा. हे गोळे खराब होईपर्यंत (काही आठवड्यांपर्यंत) पुन्हा वापरता येतात, असं म्हटलं जातं. जीन्स, टॉवेल आणि जाड कपडे धुण्यासाठी याचा जास्त वापर केला जातो.
हा हॅक कपड्यांमधील स्थिर वीज काही प्रमाणात कमी करू शकतो, पण यामुळे कपडे स्वच्छ किंवा मऊ होत नाहीत, असं गृहपयोगी वस्तूंचे तज्ज्ञ स्पष्ट करतात. उलट, यात काही धोकेही आहेत.
कपडे फाटण्याचा धोका - फॉइलचा गोळा व्यवस्थित घट्ट नसेल, तर त्याच्या टोकदार कडा रेशीम (silk), नायलॉनसारखे नाजूक कपडे फाडू शकतात.
मशीन खराब होण्याचा धोका - सततच्या वापरामुळे ॲल्युमिनियमचे तुकडे पडून ते मशीनच्या फिल्टरमध्ये अडकू शकतात किंवा ड्रमला ओरखडे येऊ शकतात.
वॉरंटी रद्द होऊ शकते - वॉशिंग मशीनमध्ये अशा अनावश्यक वस्तू टाकून मशीन खराब झाल्यास, कंपन्या वॉरंटी (Warranty) देत नाहीत.
55
मग योग्य पर्याय कोणता?
अंतिम सल्ला - कपडे एकमेकांना चिकटू नयेत आणि मऊ राहावेत असं वाटत असेल, तर बाजारात मिळणारे सुरक्षित फॅब्रिक कंडिशनर किंवा 'वूल ड्रायर बॉल्स' (Wool Dryer Balls) वापरणे हा एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे. इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक हॅकवर आंधळेपणाने विश्वास ठेवून महागडी वॉशिंग मशीन खराब करून घेऊ नका, असा इशारा तज्ज्ञ देतात.