
तुम्हाला वारंवार ताणतणाव, थकवा किंवा कोणत्याही गोष्टीत रस नसणे अशा समस्या जाणवतात का? जर हो, तर तुमच्या रोजच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर लक्ष देणं खूप गरजेचं आहे.
साधारणपणे, आपला मूड चांगला ठेवण्यासाठी मेंदूतून स्रवणारी काही रसायने मदत करतात. यामध्ये सेरोटोनिन (Serotonin), डोपामाइन (Dopamine), एंडोर्फिन (Endorphins) आणि ऑक्सिटोसिन (Oxytocin) ही महत्त्वाची आहेत. यांचा थेट संबंध आनंद, समाधान, उत्साह आणि मानसिक शांततेशी असतो.
मूड खराब असताना बिर्याणी, पिझ्झा किंवा बर्गरसारखे आवडते पदार्थ खाल्ल्याने थोड्या वेळासाठी आनंद मिळू शकतो. पण, आरोग्यदायी पदार्थ नियमितपणे खाल्ल्याने मेंदूचे कार्य आणि एकूणच आरोग्य सुधारते.
चला तर मग, मूड सुधारण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी कोणते ७ आरोग्यदायी पदार्थ मदत करतात, ते पाहूया.
जेव्हा ताणतणाव जास्त असतो, तेव्हा थोडं डार्क चॉकलेट खाल्ल्याने काहींचा मूड सुधारू शकतो. यातील फ्लेव्होनॉइड्स (Flavonoids) हे अँटी-ऑक्सिडंट्स म्हणून काम करतात, जे मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
याशिवाय, कोकोमधील काही नैसर्गिक घटक मूडशी संबंधित मेंदूच्या कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, जास्त साखर नसलेले आणि ७० टक्के किंवा त्याहून अधिक कोको असलेले डार्क चॉकलेट प्रमाणात खाणे कधीही चांगले.
केळी हा सहज उपलब्ध होणारा पौष्टिक पदार्थ आहे. यामध्ये व्हिटॅमिन बी६, पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते.
विशेषतः, व्हिटॅमिन बी६ मेंदूमध्ये सेरोटोनिन आणि डोपामाइनसारखे न्यूरोट्रान्समीटर तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे, रोजच्या आहारात एका केळ्याचा समावेश केल्याने शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे मिळतात आणि संतुलित आहाराची सवय लागते.
बदाम, काजू, अक्रोड, भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बियांमध्ये मॅग्नेशियम, झिंक, निरोगी स्निग्ध पदार्थ आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात असते.
हे पदार्थ मज्जासंस्थेचे सामान्य कार्य आणि मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. विशेषतः, भोपळ्याच्या बियांमधील मॅग्नेशियम तणाव नियंत्रित करणाऱ्या शारीरिक क्रियांना आधार देते. तुम्ही रोज मूठभर सुकामेवा आणि बिया नक्कीच खाऊ शकता.
अंडी आणि दूध हे दोन्ही शरीराला आवश्यक असलेले प्रोटीन पुरवणारे पदार्थ आहेत. अंड्यांमध्ये व्हिटॅमिन बी१२, व्हिटॅमिन डी आणि प्रोटीन असते. दुधामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीनसारखी पोषक तत्त्वे आढळतात. अंड्यातील ट्रिप्टोफॅन (Tryptophan) हे अमिनो ॲसिड सेरोटोनिन तयार करण्यास मदत करते. शरीराच्या सामान्य कार्यासाठी पुरेसे प्रोटीन मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही नाश्त्यात उकडलेले अंडे किंवा एक कप दूध घेऊ शकता.
ज्यांना मासे खायला आवडतात त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. सॅल्मन, मॅकरेल आणि सार्डिनसारख्या माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स भरपूर प्रमाणात असतात. हे मेंदूच्या आरोग्यासाठी आणि मज्जासंस्थेच्या सुरळीत कार्यासाठी फायदेशीर ठरतात. काही संशोधनांनुसार, ओमेगा-३ युक्त आहार मानसिक आरोग्यालाही आधार देऊ शकतो. आठवड्यातून दोनदा माशांचा आहारात समावेश करणे चांगले.
पोटाचे आरोग्य आणि आपला मूड यांचा एकमेकांशी संबंध असल्याचे अनेक संशोधनांमधून समोर आले आहे. यालाच 'गट-ब्रेन ॲक्सिस' (Gut-Brain Axis) असे म्हणतात.
दह्यातील चांगले बॅक्टेरिया आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. पचनक्रिया आणि शरीराच्या विविध कार्यांसाठी आतड्यांचे आरोग्य चांगले असणे खूप महत्त्वाचे आहे.
विशेष म्हणजे, शरीरातील बहुतांश सेरोटोनिन आतड्यांमध्येच तयार होते. जरी ते थेट मेंदूपर्यंत जाऊन आनंद देत नसले तरी त्याचा फायदा होतोच. तुम्ही रोजच्या आहारात दह्याचा योग्य प्रमाणात समावेश करू शकता.
ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, रास्पबेरी आणि संत्री यांसारख्या फळांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. विशेषतः, शरीराच्या सामान्य कार्यांसाठी व्हिटॅमिन सी अत्यंत आवश्यक आहे. रोज वेगवेगळ्या प्रकारची फळे खाल्ल्याने शरीर आणि मानसिक आरोग्यासाठी लागणारी पोषक तत्त्वे मिळतात.
आनंदी राहण्यासाठी फक्त खाण्यापिण्याच्या सवयीच नाही तर जीवनशैलीतही काही बदल करणे गरजेचे आहे.
हे ७ पदार्थ मानसिक आरोग्याला पोषक तत्त्वे पुरवतात. पण, ते थेट हॅप्पी हार्मोन्स वाढवणारी किंवा ताणतणाव व नैराश्यासारख्या समस्या लगेच बऱ्या करणारी औषधे नाहीत. जर तुम्हाला सतत चिंता, नैराश्य किंवा निद्रानाश जाणवत असेल, तर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
त्यामुळे, मन आनंदी ठेवण्यासाठी महागड्या पदार्थांच्या मागे धावण्याची गरज नाही. आपल्या रोजच्या आहारातील केळी, दही, अंडी, सुकामेवा आणि मासे अशा पौष्टिक पदार्थांचा योग्य प्रमाणात समावेश करा. आणि एक निरोगी जीवनशैली अंगीकारा, ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी चांगली सुरुवात होईल.