बटाट्याची साल फेकून देता? असा करा स्वच्छतेसाठी वापर
घरातील बहुतांश सामान स्वच्छ करण्यासाठी डिश वॉश साबण किंवा एखाद्या लिक्विडचा वापर केला जातो. पण बटाट्याची साल फेकून देण्याएवजी त्याचा स्वच्छतेसाठी कसा वापर करू शकता याबद्दल सविस्तर जाणून घेऊया….
Chanda Mandavkar | Published : Jan 9, 2025 8:45 AM / Updated: Jan 09 2025, 08:47 AM IST
बटाट्याचा बहुतांश भाज्यांमध्ये वापर केला जातो. यापासून वेगवेगळे पदार्थही तयार केले जातात. खरंतर, काही पदार्थ तयार करण्यासाठी बटाट्याच्या सालीचा वापर केला जात नाही. पण तुम्हाला माहितेय का, बटाट्याची साल तुम्हाला घराची स्वच्छता करण्यास कामी येऊ शकते? याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर...
बटाट्याच्या सालीपासून घराची स्वच्छता
बटाट्याच्या सालीमध्ये स्टार्च असते. यामुळे किचन स्वच्छ करण्यासाठी बटाट्याची साल कामी येऊ शकते. यासाठी बटाट्याची साल घेऊन स्टोव्ह, ओव्हन अथवा गॅस जेथे चिकटपणा आहे तेथे घासा. थोडावेळ बटाट्याच्या सालीचा रस तसाच राहू द्या आणि नंतर ओलसर कापडाने पुसून घ्या. यामुळे चिकटपणा दूर होईल.
बटाट्याच्या सालीचा वापर करत घरातील काचा आणि आरसा स्वच्छ केला जाऊ शकतो. यामुळे काचेवर असणारे डाग दूर होतात. बटाट्याच्या ओलसर साली घेऊन त्या काचा अथवा आरश्यावर घासा. यानंतर पेपर टॉवेलने पुसा.
बटाट्याचा रस केवळ लाकडाचे फर्निचर स्वच्छ होतेच. पण फर्निचरला एक वेगळी चमकही येते. यासाठी तुम्ही बटाट्याची साल फर्निचरवर घासा आणि थोडावेळ तशीच ठेवा. यानंतर सुती कापडाने पुसून घ्या.
लोखंडाच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी तुम्ही बटाट्याच्या सालीची मदत घेऊ शकता. यामध्ये असलेले ऑक्सिलिक अॅसिड लोखंडाला आलेला गंज दूर करण्यास मदत करते. यासाठी बटाट्याची साल लोखंडाच्या वस्तूवर घासा आणि ओलरस कापडाने त्याचा रस पुसून घ्या.
लेदरचे शूज स्वच्छ करण्यासाठी बटाट्याचा सालीचा वापर करू शकता. यासाठी बटाट्याची साल अस्वच्छ लेदर शूजवर घासा आणि स्वच्छ कापडाने पुसून घ्या. यामुळे शूजला नैसर्गिक रुपात चमक येईल.