Aquarium Fish Care : घरातले मासे सारखे मरतायत? 'या' ५ चुका टाळल्या तर ते नक्की जगतील!

Published : Jun 02, 2026, 03:07 PM IST
Aquarium Fish Care : घरातले मासे सारखे मरतायत? 'या' ५ चुका टाळल्या तर ते नक्की जगतील!

सार

Aquarium Fish Care : घरात मासे पाळताना फिश टँकपासून ते त्यांना दिल्या जाणाऱ्या खाण्यापर्यंत अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जर तुमचे मासे वारंवार मरत असतील, तर तुम्ही काही चुका करत आहात. त्या कोणत्या, हे जाणून घेऊया.

Aquarium Fish Care : आजकाल घर, ऑफिस किंवा हॉटेलमध्ये सजावटीसाठी मत्स्यालय ठेवण्याचा ट्रेंड वाढला आहे. रंगीबेरंगी मासे घरातील वातावरण अधिक आकर्षक आणि प्रसन्न बनवतात. अनेक अभ्यासांनुसार मत्स्यालयातील मासे पाहिल्याने तणाव कमी होतो आणि मानसिक शांतता मिळते. मात्र अनेकांना एक मोठी समस्या सतावत असते—नवीन मासे आणल्यानंतर काही दिवसांतच ते मरू लागतात.

काहीजण याला नशिबाचा भाग समजतात, तर काहीजण माशांच्या प्रजातींना दोष देतात. पण प्रत्यक्षात माशांच्या मृत्यूमागे बहुतेक वेळा आपल्या देखभालीतील चुका जबाबदार असतात. पाण्याचा दर्जा, तापमान, अन्न, ऑक्सिजन आणि स्वच्छता याकडे दुर्लक्ष केल्यास निरोगी मासेसुद्धा काही दिवसांत आजारी पडू शकतात. त्यामुळे मत्स्यालयाची योग्य देखभाल करणे अत्यंत आवश्यक आहे.

पाणी वेळेवर न बदलणे आणि गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणे

मत्स्यालयातील माशांच्या मृत्यूमागील सर्वात मोठे कारण म्हणजे खराब पाणी. अनेकजण महिनोनमहिने पाणी बदलत नाहीत किंवा पूर्ण पाणी एकदम बदलून टाकतात. या दोन्ही गोष्टी धोकादायक ठरू शकतात. माशांच्या विष्ठेमुळे आणि उरलेल्या अन्नामुळे पाण्यात अमोनिया, नायट्राइट आणि इतर हानिकारक घटक तयार होतात. यामुळे माशांना श्वास घेण्यास त्रास होतो आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. तज्ज्ञांच्या मते, आठवड्यातून एकदा 20 ते 30 टक्के पाणी बदलणे योग्य असते. पूर्ण पाणी एकाच वेळी बदलू नये, कारण त्यामुळे पाण्याचे रासायनिक संतुलन बिघडते. नळाचे पाणी थेट टाकताना त्यातील क्लोरीन आणि इतर रसायने माशांसाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे Water Conditioner चा वापर करणे आवश्यक आहे.

माशांना जास्त अन्न देणे

अनेकांना वाटते की जास्त अन्न दिल्याने मासे अधिक निरोगी राहतील. पण ही सर्वात सामान्य आणि गंभीर चूक आहे. मासे त्यांच्या गरजेपेक्षा जास्त अन्न खाऊ शकत नाहीत. उरलेले अन्न पाण्यात कुजते आणि विषारी घटक तयार करते. यामुळे पाण्याची गुणवत्ता खराब होते आणि बॅक्टेरियांची वाढ होते. परिणामी मासे आजारी पडतात. सामान्यतः मासे दोन ते तीन मिनिटांत खाऊ शकतील इतकेच अन्न द्यावे. दिवसातून एक किंवा दोन वेळा खाऊ घालणे पुरेसे असते.अनेकदा मुलांच्या हट्टामुळे किंवा माशांबद्दल प्रेमापोटी लोक वारंवार अन्न टाकतात. ही सवय माशांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.

क्सिजन आणि फिल्टरची योग्य व्यवस्था नसणे

मत्स्यालयातील मासे जिवंत राहण्यासाठी स्वच्छ पाण्यासोबत पुरेशा ऑक्सिजनचीही आवश्यकता असते. अनेक छोटे Aquarium फक्त सजावटीसाठी ठेवले जातात, पण त्यामध्ये फिल्टर किंवा एअर पंप बसवला जात नाही.पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली की मासे पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन तोंड उघडून श्वास घेण्याचा प्रयत्न करतात. हे ऑक्सिजनच्या कमतरतेचे लक्षण आहे. जर वेळेवर उपाय केले नाहीत तर मासे मरू शकतात. फिल्टर केवळ पाणी स्वच्छ ठेवत नाही तर त्याद्वारे पाण्यातील ऑक्सिजनची देवाणघेवाणही सुधारते. त्यामुळे मत्स्यालयाच्या आकारानुसार योग्य फिल्टर आणि एअर पंप वापरणे गरजेचे आहे.

 खूप जास्त मासे एकाच टँकमध्ये ठेवणे

अनेकांना मत्स्यालय अधिक आकर्षक दिसावे म्हणून जास्तीत जास्त मासे ठेवण्याची सवय असते. पण यामुळे Overcrowding ची समस्या निर्माण होते.प्रत्येक माशाला पोहण्यासाठी आणि वाढण्यासाठी ठराविक जागेची गरज असते. जास्त मासे असल्यास ऑक्सिजन कमी पडतो, पाणी लवकर खराब होते आणि माशांमध्ये तणाव वाढतो. तणावामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते आणि रोगांचा धोका वाढतो. तज्ज्ञांच्या मते, मत्स्यालयाच्या क्षमतेनुसारच मासे ठेवावेत. विविध प्रजातींचे मासे एकत्र ठेवताना त्यांचा स्वभाव आणि गरजा लक्षात घेणेही महत्त्वाचे असते. काही मासे आक्रमक असतात आणि इतर माशांना इजा पोहोचवू शकतात.

तापमानातील अचानक बदल

माशांसाठी पाण्याचे तापमान अत्यंत महत्त्वाचे असते. विशेषतः Tropical Fish साठी विशिष्ट तापमान आवश्यक असते. अचानक तापमान बदलल्यास माशांना धक्का बसू शकतो. नवीन मासे विकत आणल्यानंतर अनेकजण त्यांना थेट मत्स्यालयात सोडतात. ही मोठी चूक आहे. नवीन माशांच्या पिशवीतील आणि मत्स्यालयातील पाण्याचे तापमान वेगळे असू शकते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, नवीन माशांची पिशवी 15 ते 20 मिनिटे मत्स्यालयात तरंगत ठेवावी. यामुळे तापमान समान होते आणि मास्यांना वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी वेळ मिळतो.

काही अतिरिक्त टिप्स

माशांच्या शरीरावर पांढरे डाग, रंग फिका पडणे किंवा वारंवार पृष्ठभागावर येणे ही आजाराची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. अशावेळी त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.मत्स्यालय थेट सूर्यप्रकाशात ठेवू नये. त्यामुळे पाण्यात शेवाळ वाढू शकते. तसेच दर आठवड्याला फिल्टरची तपासणी करावी. माशांसाठी संतुलित आहार आणि नियमित देखभाल केल्यास ते अनेक वर्षे निरोगी राहू शकतात.

 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

मंडला आर्ट मेहंदीच्या 6 खास डिझाइन्स, हात दिसतील भरलेले
Home Remedies : पाण्यामुळे बाथरुमच्या दरवाजा खराब झालाय? करा हे ५ घरगुती उपाय