
भारतीय रेल्वेच्या आगामी वंदे भारत स्लीपर ट्रेनची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी एक खास फीचर देण्यात आलं आहे. ट्रॅव्हलर धनंजय कुमार यांनी नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी दाखवलंय की, नव्या ट्रेनचा स्लायडिंग डोअर (सरकता दरवाजा) प्रवाशांच्या बसण्याच्या जागेपासून थोड्या अंतरावर बसवण्यात आला आहे. दरवाजा आणि बर्थ यांच्यात चांगलं अंतर ठेवण्यात आलं आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करताना सतत दरवाजा उघड-बंद झाल्यामुळे किंवा लोकांच्या ये-जा करण्यामुळे प्रवाशांची झोपमोड होते. नव्या डिझाईनमुळे हा त्रास कमी होणार आहे.
जुन्या ट्रेन्स आणि वंदे भारत स्लीपरच्या नव्या डिझाईनची या व्हिडीओमध्ये तुलना करण्यात आली आहे. स्लायडिंग डोअर आणि सीटिंग एरियामध्ये असलेल्या गॅपमुळे प्रवाशांना आता अधिक आरामदायी प्रवास करता येणार आहे.
धनंजय कुमार यांनी व्हिडीओत स्पष्ट केलंय की, अनेक ट्रेन्समधील पारंपारिक 3AC कोचचे दरवाजे काही बर्थच्या अगदी जवळ असतात. त्यामुळे तिथे बसलेल्या प्रवाशांना सतत त्रास सहन करावा लागतो. वेंडर्स आणि इतर प्रवाशांच्या सततच्या हालचालीमुळे त्यांची चिडचिड होते. पण वंदे भारत स्लीपरमध्ये हा प्रॉब्लेम सोडवण्यात आला आहे. यात स्लायडिंग डोअर सीटिंग एरियापासून बऱ्याच अंतरावर लावला आहे. यामुळे दरवाजाजवळ होणारी गर्दी आणि आवाज प्रवाशांपर्यंत पोहोचत नाही.
त्यांनी हेही निदर्शनास आणून दिलं की, आता प्रवासी दरवाजाच्या दिशेने डोकं करूनही शांतपणे झोपू शकतात. स्लायडिंग मेकॅनिझममुळे दरवाजा उघडणं आणि बंद करणं अधिक सोपं झालं आहे.
राजधानीसारख्या जुन्या ट्रेन्सच्या AC 3-टियर कोचमध्ये प्रवास करताना अनेकांना एकच मोठी अडचण येते. ज्यांचे बर्थ कोचच्या दरवाजाजवळ किंवा टॉयलेट एरियाजवळ असतात, त्यांना सततच्या हालचालींचा त्रास होतो. लोक सतत ये-जा करत असतात, वेंडर्स फिरत असतात आणि दरवाजा सतत उघड-बंद होत असतो.
रात्रीच्या प्रवासात या गोंधळामुळे झोप लागणं कठीण होतं. वंदे भारत स्लीपरमधील नव्या रचनेमुळे हीच अडचण दूर होणार आहे. यात स्लायडिंग डोअर आणि सीटिंग एरियामध्ये गॅप ठेवल्यामुळे प्रवाशांना शांतपणे प्रवास करता येईल.
या नव्या फीचरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर युजर्सनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या बदलाचं स्वागत करत रेल्वेचं कौतुक केलं आहे.
एका युजरने कमेंट केली, "प्रवाशांसाठी ही खूप मोठी सुधारणा आहे."
दुसऱ्याने लिहिलं, "छान पाऊल. प्रत्येक ट्रेनमध्ये हे कॉपी करायला हवं."
तिसऱ्या युजरने म्हटलं, "रेल्वे विभागाने उचललेलं हे एक उत्तम पाऊल आहे."
या छोट्याशा बदलामुळे लांब पल्ल्याचा प्रवास किती सुखकर होऊ शकतो, याचीच चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे. स्लायडिंग डोअर हा जरी छोटा बदल वाटत असला, तरी ज्यांनी दरवाजाजवळच्या बर्थवर प्रवास केलाय, त्यांच्यासाठी हा बदल खूप महत्त्वाचा आहे.