
अहमदाबाद : आयपीएल २०२५ चा अंतिम सामना रॉयल चॅलेंज बंगळुरु आणि पंजाब किंग्स यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे खेळला जात आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत ९ गडी बाद १९० धावा केल्या आणि पंजाबसमोर १९१ धावांचे लक्ष्य ठेवले. विराट कोहलीने ३५ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. विराटकडून या अंतिम सामन्यात मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण तो जास्त काळ टिकू शकला नाही. जरी तो मोठी खेळी खेळण्यात चुकला असला तरी त्याने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. किंगने शिखर धवनचा एक विक्रम मोडला.
इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात सर्वाधिक चौकार मारण्याच्या बाबतीत विराट कोहलीने शिखर धवनचा विक्रम मोडला आहे. पंजाबविरुद्ध त्याने ३ चौकार मारले. विराट आता चौकार मारण्याच्या बाबतीत सर्वात पुढे नंबर १ वर आला आहे. या फटाफट क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर आता ७७१ चौकार झाले आहेत. यापूर्वी नंबर एकवर शिखर धवनचे नाव होते, ज्याने आयपीएलमध्ये एकूण ७६८ चौकार मारले होते. हे काम किंग कोहलीने २६७ व्या सामन्यात करून दाखवले आहे.
याशिवाय विराट कोहलीने अंतिम सामन्यात ४३ धावांची खेळी करून आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. तो आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही बनला आहे. पंजाब किंग्सविरुद्ध त्याच्या नावावर सर्वाधिक ११५९ धावा झाल्या आहेत. यापूर्वी त्याने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्या संघाविरुद्ध कोहलीच्या बॅटने ११४६ धावा निघाल्या होत्या. पण, आता त्याने स्वतःचाच विक्रम मोडत एक मोठा विक्रम रचला आहे.