
Viral video : सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म कधी कसे वापरायचे, याचे भान अनेकांना नसते. त्यामुळे बेधडक कमेंट, भडक मतप्रदर्शन केले जाते आणि वादंग निर्माण होतात. कधी कधी हे वादंग इतके वाढतात की, त्यातून कटूता निर्माण होते. याच्याबरोबरीने या प्लॅटफॉर्मद्वारे काही समज पसरवले जातात. काही जण त्याचा आनंद घेतात तर, काही जण त्याकडे गांभीर्याने बघतात आणि त्याचे कसोशिने पालन करण्याचा प्रयत्न करतात. मग तो ट्रेंडच बनतो.
नवीन वर्षाच्या रात्री 12 द्राक्षे खाणे हा या वर्षीचा मुख्य न्यू इयर सोशल मीडिया ट्रेंड होता. असे केल्याने वर्षभर समृद्धी, ऐश्वर्य, आनंद आणि प्रेम मिळते, असा सांगितले गेले. ट्रेंड आहे म्हणून किंवा श्रद्धेपोटी अनेकांनी हा ते फॉलो केले. आता एका दुकानदाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो म्हणतो की, किमान दोनशे-तीनशे लोकांना द्राक्षे न मिळाल्याने निराश होऊन दुकानातून परतावे लागले असेल.
'रात्री 12 नंतर टेबलखाली बसून 12 द्राक्षे खाल्ल्याने नशीब उजळते, असं द्राक्षे खरेदी करायला आलेल्या लोकांनी मला सांगितलं,' असं दुकानदार म्हणतो. त्याच्याकडे आता एकही द्राक्ष शिल्लक नाही, असंही तो सांगतो. बाजारात कुठेही द्राक्षे मिळण्याची शक्यता 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे, असं म्हणताना दुकानदार व्हिडिओमध्ये दिसतो. '200-300 लोक रिकाम्या हाताने परतले, तर असंख्य लोकांनी द्राक्षे विकत घेतली,' असंही तो म्हणाला. विशेष म्हणजे, लोक हिरवी द्राक्षेच विकत घेत आहेत. कारण, या 12 द्राक्षे खाण्याच्या प्रथेसाठी हिरवी द्राक्षेच लागतात.
12 द्राक्ष चॅलेंज ('12 Grapes Challenge')
काय आहे हे 'भाग्याचे बारा द्राक्षे'? नवीन वर्षाच्या रात्री म्हणजेच 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 द्राक्षे खाण्याची ही प्रथा आहे. ही 12 द्राक्षे येणाऱ्या वर्षातील 12 महिन्यांचे प्रतीक आहेत. नुसतं खायचं नाही, तर एका मिनिटात 12 द्राक्षे खाऊन पूर्ण केल्यास येणारं संपूर्ण वर्ष भाग्य, यश आणि समृद्धी देणारं ठरतं, असा विश्वास आहे. याची सुरुवात स्पेनमध्ये झाली. 1900 च्या दशकाच्या सुरुवातीला स्पेनमधील शेतकऱ्यांनी द्राक्षांचे उत्पादन वाढल्यावर त्याची विक्री वाढवण्यासाठी ही प्रथा सुरू केली. पण, आता हा एक ट्रेंड बनला आहे. या प्रथेचा भाग नसतानाही लोक द्राक्षे खात आहेत. यासंबंधीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.