
(Crime News) म्हैसूर : गेल्या दोन दिवसांत म्हैसूर आणि आसपासचा परिसर गुन्हेगारीच्या विविध घटनांनी हादरले. नंजनगुड शहरातील एका अपघाताच्या घटनेभोवती संशयाचे धुके दाटले आहे. यात एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला असून हा अपघात आहे की त्याला ठार मारले आहे, या दृष्टीने तपास सुरू आहे. तर, मंड्या विद्यापीठाच्या आवारात ड्रग्जच्या सिरिंज सापडल्याने खळबळ उडाली आहे. याशिवाय, मुलीवरून काही विद्यार्थ्य्यांवर हल्ला झाल्याचेही समोर आले आहे.
नंजनगुड शहराच्या बाहेरील कोरेहुंडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका तरुणाचा बाईकसह जळालेला मृतदेह आढळला आहे. बाईकने पेट घेऊन त्यात त्याचा होरपळून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तथापि, तरुणाच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. म्हैसूर जिल्ह्यातील नंजनगुड तालुक्यातील रामपूर गावातील आदित्य (23) असे मृत तरुणाचे नाव आहे. नंजनगुडहून कोरेहुंडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील हुल्लहल्ली नाल्याजवळील निर्जन ठिकाणी सोमवारी रात्री आदित्यचा मृतदेह आणि बाईक पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आढळले.
एका खासगी कारखान्यात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करणारा आदित्य, सोमवारी सकाळी आपली बाईक दुरुस्त करतो असे सांगून घरातून गेला होता, पण तो परत आलाच नाही. दुपारी 4 वाजता आदित्यची आई अंबिका यांनी, त्याला लवकर घरी येण्यासाठी फोन केला, तेव्हा आदित्यने लवकर घरी येतो, असे आईला सांगितले होते. सायंकाळी 7 वाजता तो बाईकसह जळून खाक झाल्याची माहिती एका व्यक्तींनी फोनवरून पालकांना दिली.
याप्रकरणी मृत तरुणाचे वडील मादेश यांनी मुलाच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत नंजनगुड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो वारसांना सोपवला असून, पुढील तपास सुरू केला आहे.
हासन/अरकलगूड : मुलीच्या कारणावरून तरुणांच्या एका गटाने फिल्मी स्टाईलने बस अडवून बसमधील विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याची घटना हासन जिल्ह्यातील अरकलगूड तालुक्यातील जोडीगुब्बी गावात घडली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी जोडीगुब्बीहून अज्जूरकडे बसने जात असताना, संतेमरूरजवळ स्थानिक तरुणांच्या एका गटाने बस अडवून आत प्रवेश केला. त्यानंतर, त्यांनी विद्यार्थ्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. बसमधील विद्यार्थिनींसमोरच हा हल्ला करण्यात आला. मुलीच्या कारणावरून हा वाद झाल्याचे म्हटले जात आहे.
हुबळी : जन्मत:; आतडे बाहेर आल्याने मृत्यूशी झुंज देत असलेल्या नवजात बाळाला रविवारी कोप्पळहून हुबळी येथील KMCRI मध्ये झिरो ट्रॅफिकमध्ये आणून उपचार देण्यात आले, मात्र मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. कुकनूर तालुक्यातील गुत्तूर गावातील मल्लप्पा-विजयालक्ष्मी दाम्पत्याला शनिवारी रात्री कुकनूर सरकारी रुग्णालयात मुलगा झाला होता. मात्र, जन्माच्या वेळीच बाळाची आतडी पूर्णपणे बाहेर आली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रियेची गरज असल्याचे सांगून बाळाला पुढील उपचारांसाठी हुबळीला पाठवण्यास सांगितले होते.
मंड्या : मंड्या विद्यापीठाच्या बांधकाम सुरू असलेल्या इनडोअर स्टेडियमच्या आवारात दहापेक्षा जास्त ड्रग्जच्या सिरींज सापडल्या आहेत. विद्यार्थ्यांनी ड्रग्ज सेवन करून या सिरींज फेकल्या असाव्यात, असा दाट संशय व्यक्त केला जात आहे. इनडोअर स्टेडियमचे काम सात-आठ वर्षांपासून अर्धवट स्थितीत आहे. हे स्टेडियम विद्यापीठाच्या मागील बाजूस आहे. येथे दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे यांच्यासोबतच सिरींजही सापडल्या आहेत. या सिरींज आवारात सर्वत्र फेकलेल्या आढळल्या.
विद्यापीठात ड्रग्ज कुठून पुरवले जात आहेत, कोण पुरवत आहे, विद्यार्थीच ते येथे आणून सेवन करत आहेत की, बाहेरचे लोक येऊन सेवन करून फेकून गेले आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. माहिती मिळताच विद्यापीठाचे कुलगुरू शिवचित्तप्पा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.