
Dhaka Flight Scare: ढाक्याच्या हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर यूएस-बांगला एअरलाइन्सचे एक विमान मोठ्या दुर्घटनेतून थोडक्यात बचावले. सौदी अरेबियातील जेद्दाहला जाणारे हे विमान उड्डाण करण्याच्या तयारीत असतानाच त्यात तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले. धोका ओळखून पायलटने लगेच टेक-ऑफ रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि विमान रनवेवरच सुरक्षितपणे थांबवले. पण विमान थांबल्यानंतर लँडिंग गियर म्हणजेच चाकांच्या भागातून धूर निघताना दिसला, ज्यामुळे विमानतळ परिसरात मोठी भीती पसरली. रनवे आणि चाकांमधील जास्त घर्षणामुळे धूर निर्माण झाल्याची माहिती यूएस-बांगला एअरलाइन्सने दिली आहे.
व्हिडिओ पाहा
NOW: Smoke spotted near the landing gear of a Jeddah-bound US-Bangla Airlines flight after the pilot aborted takeoff due to a technical issue at Hazrat Shahjalal International Airport in Dhaka, Bangladesh.
All 420 passengers safely evacuated. https://t.co/2UJH9WmL83
— Weather Monitor (@WeatherMonitors) November 29, 2026
धूर दिसताच विमानतळ प्राधिकरण सक्रिय झाले आणि आपत्कालीन यंत्रणा सुरू करण्यात आली. सुरुवातीला प्रवासी विमानातच होते, परंतु परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकर विमान रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले. ग्राउंड स्टाफ आणि आपत्कालीन बचाव पथकाच्या तत्परतेमुळे विमानातील सर्व ४२० प्रवासी आणि क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही आणि सर्व प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
पायलटने योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळेच हा मोठा धोका टळला. या घटनेमुळे विमानतळावरील सेवा तात्पुरती विस्कळीत झाली आणि जेद्दाहला जाणारे हे फ्लाइट वेळेवर उड्डाण करू शकले नाही. लँडिंग गियर किंवा ब्रेकच्या समस्येमुळे हा धूर येत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अधिकारी विमानाची तपासणी करत असून तांत्रिक बिघाडाचे खरे कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.
यूएस-बांगलाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, रविवारी बांगलादेशच्या स्थानिक वेळेनुसार दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी यूएस-बांगलाचे बीएस-३६१ फ्लाइट टेक-ऑफ करण्याच्या अगदी आधी कॉकपिटमधील यंत्रणेत काही विसंगती दिसल्याने पायलटने टेक-ऑफ रद्द करण्याचा निर्णय घेतला. विमानाच्या इंजिनला, चाकांना, लँडिंग गियरला किंवा इतर कोणत्याही भागाला आग लागली नव्हती. निर्धारित प्रक्रिया पार पाडत विमान रनवेवरून पार्किंग परिसरात नेण्यात आले आणि प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. फ्लाइटचे सर्व प्रवासी हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनलवर सुरक्षित आहेत.