Tanvi Sharma: सय्यद मोदी इंटरनॅशनल फायनलमध्ये तन्वी शर्माचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले, थाई खेळाडूकडून पराभव

vivek panmand   | CMS
Published : Nov 29, 2026, 10:00 PM IST
tanvi sharma

सार

Indian Shuttler Tanvi Sharma: भारतीय बॅडमिंटनची नवी स्टार तन्वी शर्माला सय्यद मोदी इंटरनॅशनल स्पर्धेत (Syed Modi International 2026) चांगल्या कामगिरीनंतरही फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. महिला एकेरीच्या अंतिम फेरीत थायलंडच्या सुपाणिदा कातेथोंगकडून तिला पराभव स्वीकारावा लागला.

Syed Modi International 2026: भारताची उगवती स्टार तन्वी शर्मा (Tanvi Sharma) हिला सय्यद मोदी इंटरनॅशनल बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. रविवारी लखनऊमध्ये (Lucknow) झालेल्या महिला एकेरीच्या फायनलमध्ये थायलंडच्या (Thailand) सुपाणिदा कातेथोंगने (Supanida Katethong) १७ वर्षीय भारतीय शटलरला तीन गेमच्या चुरशीच्या लढतीत पराभूत केले. पहिला गेम जिंकूनही तन्वीला विजय मिळवता आला नाही. या मॅचचा निकाल २१-११, १२-२१, १५-२१ असा राहिला. या पराभवामुळे सय्यद मोदी इंटरनॅशनलमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद पटकावणारी तिसरी भारतीय खेळाडू बनण्याची संधी तन्वीने गमावली. याआधी भारताच्या पीव्ही सिंधू (PV Sindhu) (२०१७, २०२२ आणि २०२४) आणि सायना नेहवाल (Saina Nehwal) (२००९, २०१४ आणि २०१५) यांनी या स्पर्धेत महिला एकेरीचे जेतेपद पटकावले आहे. या यादीत आपले नाव नोंदवण्याची संधी तन्वीसमोर होती, पण ती शक्य झाली नाही.

लढा देऊनही तन्वीचा पराभव

लखनऊमधील यूपी बॅडमिंटन अकादमीत (UP Badminton Academy) प्रेक्षकांच्या उपस्थितीत २१ व्या रँकिंगवर असलेल्या तन्वीने शानदार सुरुवात केली. तिने आपल्या विविध शॉट्स आणि आक्रमक खेळामुळे डाव्या हाताच्या थाई प्रतिस्पर्ध्याला सुरुवातीपासूनच दबावात ठेवले. पहिला गेम तिने २१-११ असा सहज जिंकून फायनलमध्ये आघाडी घेतली. मात्र, दुसऱ्या गेमपासून मॅचचे चित्र बदलले. तन्वीकडून एकापाठोपाठ एक अनफोर्स्ड एरर्स होऊ लागले. ६-९ ने पिछाडीवर पडल्यानंतर कातेथोंगने पुढील १८ पैकी १५ पॉइंट्स जिंकले आणि दुसरा गेम २१-१२ ने जिंकत मॅचमध्ये बरोबरी साधली. निर्णायक तिसऱ्या गेममध्येही तन्वीला चुकांची मोठी किंमत मोजावी लागली. तिने शटल अनेकदा कोर्टच्या बाहेर मारले. लांब रॅलीमध्ये प्रतिस्पर्ध्याला दबावात ठेवण्याऐवजी तिने घाईघाईत पॉइंट्स संपवण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, पहिला गेम गमावल्यानंतर कातेथोंगने आपल्या खेळाचा वेग आणि आक्रमकता वाढवली. तन्वीचा थकवाही तिच्या कामगिरीवर परिणाम करत असावा, कारण फायनलपूर्वीच्या तीनही फेऱ्यांमध्ये तिला लांब मॅचेस खेळाव्या लागल्या होत्या. विशेषत: सेमीफायनलमध्ये उन्नती हुड्डाविरुद्धचा तिचा सामना खूप कठीण होता. त्यामुळे फायनलच्या मोक्याच्या क्षणी शारीरिक थकवा सांभाळणे तिला कठीण गेले. मात्र, फायनलमध्ये हरली असली तरी तन्वीसाठी एक आनंदाची बातमी आहे. या कामगिरीमुळे ती महिला एकेरीच्या जागतिक क्रमवारीत टॉप २० मध्ये प्रवेश करणार आहे. कमी वयात ही कामगिरी करणारी तन्वी दुसरी भारतीय ठरेल, याआधी केवळ सिंधूनेच हा विक्रम केला होता.

महिला दुहेरीतही भारताला अपयश

रविवारी दिवसाच्या सुरुवातीला महिला दुहेरीच्या फायनलमध्येही भारतीयांची निराशा झाली. सलग तिसऱ्यांदा सय्यद मोदी इंटरनॅशनलचे विजेतेपद पटकावण्याची संधी त्रिशा जॉली (Treesa Jolly) आणि गायत्री गोपीचंद (Gayatri Gopichand) या जोडीने गमावली. इंडोनेशियाच्या चौथ्या मानांकित इसियाना मेईदा आणि रिंजानी नास्टिन या जोडीने त्यांचा पराभव केला. निर्णायक गेममध्ये १९-१४ अशी आघाडी घेऊनही भारताच्या अव्वल मानांकित जोडीला पराभव पत्करावा लागला. सलग सात पॉइंट्स गमावून त्यांनी विजेतेपद गमावले. पहिला गेम २४-२२ असा जिंकल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये त्यांचा १२-२१ असा पराभव झाला. निर्णायक गेममध्येही मोक्याच्या क्षणी लय गमावल्याने त्यांना विजेतेपदावर पाणी सोडावे लागले.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Delimitation Bill: डिलिमिटेशनवर स्टॅलिन ठाम, मागे हटण्यास नकार... केंद्राला पाठिंबा का?
Mahesh Babu: महेश बाबूने घेतली तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट