25 जून 2024 मंगळवारच्या टॉप 10 न्यूज, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची राष्ट्रीयकृत बँकांना तंबी

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स तुम्हाला मिळणार आहेत.

 

1. Devendra Fadnavis On Bank Crop Loan : पीककर्ज देताना शेतकऱ्यांना सिबिल स्कोर मागू नका, देवेंद्र फडणवीसांची राष्ट्रीयकृत बँकांना तंबी

पीक कर्ज देताना शेतकऱ्यांकडून सिबिल स्कोअरची मागणी केल्यास एफआयआर दाखल करण्यात येईल, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय बँकांना दिला आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतर बँकांनी सरकारकडे जाऊ नये, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत हा इशारा देण्यात आला.

2. Pune Porsche accident Case : पोर्शे अपघातातील अल्पवयीन मुलाचा हायकोर्टाने जामीन केला मंजूर, आत्याने दाखल केली होती याचिका

अल्पवयीन मुलाला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जामिनानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेणे बेकायदेशीर असून बालसुधारगृहाच्या कस्टडीतून तात्काळ मुक्त करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. अल्पवयीन मुलाला आत्याच्या ताब्यात देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

3. महाराष्ट्रातील ४८ पैकी ३६ खासदारांनी मराठीतून घेतली शपथ, हिंदी, इंग्रजीत शपथ घेणारे 'ते' १२ कोण?

लोकसभेच्या विशेष अधिवेशनात सभागृहाचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यात आली. मागील २ दिवसांत महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी संसदेत शपथ घेतली. यातील बहुसंख्य खासदारांनी मातृभाषा मराठीत शपथ घेतली तर काही खासदारांनी इंग्रजी आणि हिंदी भाषेत शपथ घेतली. राज्यातील ४८ खासदारांपैकी ३६ खासदारांनी मराठी भाषेत संसदेत शपथ घेतली. तर ९ खासदारांनी हिंदी भाषेत आणि ३ खासदारांनी इंग्रजी भाषेत शपथ घेतली.

4. निलेश लंकेंनी इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ, शेवटी रामकृष्ण हरी म्हणत जोडले हात

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या सुजय विखे पाटलांचा पराभव करून निलेश लंके विजयी झाले. आज लंके यांनी लोकसभेचा सदस्य म्हणून संसदेत इंग्रजी भाषेतून शपथ घेतली. निलेश लंकेंनी इंग्रजी भाषेत घेतलेली शपथ सध्या चर्चेचा मुद्दा बनली आहे.

5. 'वाट चुकलेल्या कोकराला पुन्हा जवळ घेतलं', सूर्यकांता पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करताना झाल्या भावुक

भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. २०१४ साली राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपचं कमळ हाती घेतलेल्या पाटील यांनी दशकभरानंतर घरवापसी केली आहे. जुन्या पक्षात पुन्हा प्रवेश करताना सूर्यकांता पाटील या काहीशा भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

6. NEET घोटाळा: पेपर लीक माफियाचा मोठा खुलासा, 700 विद्यार्थ्यांना 300 कोटी रुपये कमावण्याचे लक्ष्य

NEET पेपर फुटीवरून संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पेपर लीक माफिया बिजेंद्र गुप्ता याने मोठा खुलासा केला आहे. 200-300 कोटी रुपये कमवण्यासाठी माफियांनी लाखो विद्यार्थ्यांचे आयुष्य कसे उद्ध्वस्त केले हे त्यांनी सांगितले आहे.

7. उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना ट्रायल कोर्टातून दिलेला जामीन रद्द, म्हटले जामीन देताना विवेकाचा वापर केला नाही

दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना राऊस एव्हेन्यू कोर्टाने दिलेला नियमित जामीन रद्द केला आहे. जामीन मंजूर करताना ट्रायल कोर्टाने विवेकबुद्धीचा वापर केला नसल्याचा आरोप हायकोर्टाने केला आहे. ईडीला युक्तिवाद करण्याची पुरेशी संधी देण्यात आली नाही. जामीन मंजूर करताना युक्तिवाद योग्य प्रकारे झाला नाही, त्यामुळे ट्रायल कोर्टाचा जामीन रद्द करण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

8. एनडीएने लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांची निवड केली, इंडिया ब्लॉकने के. सुरेश यांना मैदानात उतरवले

सोमवारपासून संसदेचे अधिवेशन सुरू झाले आहे. नव्या अधिवेशनात लोकसभा अध्यक्षांसाठीही निवडणूक होणार आहे. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, राजनाथ सिंह यांनी रात्री उशिरापर्यंत इंडिया ब्लॉकच्या नेत्यांशी चर्चा केली परंतु त्यांना यश आले नाही. आज एनडीएने अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांची निवड केली आणि इंडिया ब्लॉकने के. सुरेश यांना मैदानात उतरवले आहे.

9. 'Emergency' सिनेमा प्रदर्शित होण्याची नवी तारीख जाहीर, पाहा पोस्टरवरील कंगना राणौतचा जबरदस्त लूक

अभिनेत्री कंगना राणौतचा आगामी सिनेमा इमरजेंसीची प्रेक्षकांची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहिली जात आहे. वारंवार सिनेमाचा प्रदर्शित होण्याची तारीख बदलण्यात आली आहे. अशातच सिनेमाची कंन्फर्म तारीख समोर आली आहे. कंगना राणौतने इंस्टाग्रावर इमरजेंसी सिनेमाचे नवे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरवर सिनेमा 6 सप्टेंबर, 2024 असे लिहिले आहे.

10. Indian Army Robot Dogs : भारतीय सैन्यात लवकरच 'रोबो डॉग्स' दाखल होणार, शत्रुवर तुटून पडणार 'रोबो डॉग्स'

भारतीय सैन्यात लवकरच कुत्र्यांच्या आकाराचे रोबोटिक MULES, म्हणजेच मल्टी-युटिलिटी लेग्ड इक्विपमेंट सामील केले जाणार आहेत. हे रोबोट कुत्रे गरज पडल्यास शत्रुंवर गोळीदेखील चालवू शकतात. यांचा वापर प्रामुख्याने पाळत ठेवणे आणि कमी वजनाचे सामान वाहून नेण्यासाठी केला जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लष्कराने 100 रोबो कुत्र्यांची ऑर्डर दिली होती. आता पहिल्या बॅचमधील 25 MULES ची तपासणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे लवकरच हे रोबो कुत्रे सैन्यात सामील होणार आहेत.

Share this article