इव्हीएम वाद: ममतांच्या टीएमसीकडून काँग्रेसवर टीका

इव्हीएमबद्दल प्रश्न उपस्थित करणार्‍यांनी निवडणूक आयोगाला त्यातील त्रुटींचे प्रात्यक्षिक दाखवावे. केवळ आरोप करणे पुरेसे नाही. इव्हीएम हॅक करता येतात असे जर कोणाला वाटत असेल तर त्यांनी निवडणूक आयोगाला भेटून ते सिद्ध करावे.

नवदिल्ली: 'इव्हीएम (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) मध्ये घोळ केला जात आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच मतपत्रिका पुन्हा वापरात आणाव्यात' असा आग्रह धरणार्‍या काँग्रेसच्या भूमिकेला 'इंडिया' आघाडीतूनच विरोध होत आहे.

काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी काँग्रेसच्या भूमिकेला विरोध केला होता. त्यानंतर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसनेही अशीच भूमिका घेतली आहे.

सोमवारी टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी म्हणाले, 'इव्हीएमबद्दल प्रश्न उपस्थित करणार्‍यांनी निवडणूक आयोगाला त्यातील त्रुटींचे प्रात्यक्षिक दाखवावे. केवळ आरोप करणे पुरेसे नाही. इव्हीएम हॅक करता येतात असे जर कोणाला वाटत असेल तर त्यांनी निवडणूक आयोगाला भेटून ते सिद्ध करावे. फक्त विधाने करून चालणार नाही.'

यामुळे काँग्रेसचा आग्रह तर्कसंगत नाही असा त्यांनी अप्रत्यक्षपणे सूर लावला. अभिषेक हे तृणमूल काँग्रेसचे ममतांनंतरचे दुसरे क्रमांकाचे नेते मानले जातात. काँग्रेसमध्येही इव्हीएमविरोधात एकमत नाही. काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनीही अलीकडेच 'इव्हीएमच्या क्षमतेबद्दल मला कोणतीही शंका नाही' असे म्हटले होते.

ओमर अब्दुल्ला यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, ‘इव्हीएमवर शंका असेल तर निवडणूकच लढवू नये. पराभवानंतर इव्हीएमना दोष देणे थांबवा, निवडणूक निकाल स्वीकारा.’

प्रल्हाद जोशी यांचा हल्लाबोल:

दरम्यान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोमवारी म्हटले की, 'इव्हीएमना दोष देऊन काहीही साध्य होणार नाही हे काँग्रेसला आता तरी कळावे. काँग्रेसचे मित्रपक्ष आता इव्हीएमच्या बाजूने उभे आहेत' असा टोला त्यांनी लगावला. महाराष्ट्र आणि हरियाणा निवडणुकांमधील पराभवानंतर काँग्रेसमध्ये इव्हीएमबद्दल नाराजी वाढली आहे.

• इव्हीएमऐवजी मतपत्रिका पुन्हा वापरात आणाव्यात असा काँग्रेसचा आग्रह
• काँग्रेसच्या या मागणीला विरोधी 'इंडिया' आघाडीतील पक्षांचाही पाठिंबा नाही
• इव्हीएमबद्दल शंका असेल तर निवडणूकच लढवू नका असे ओमर अब्दुल्ला म्हणाले होते
• आता आणखी एक मित्रपक्ष टीएमसीनेही काँग्रेसच्या इव्हीएमविरोधी भूमिकेला विरोध केला

Share this article