Temple Village : एक-दोन नव्हे... तब्बल १०८ प्राचीन मंदिरे! हे गाव कुठे आहे माहितीये का?

Published : Nov 24, 2026, 03:47 PM IST

भारतात अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. काही शेकडो वर्षांचा इतिहास सांगतात, तर काही अद्भुत शिल्पकलेचा नमुना आहेत. पण एका छोट्या गावात तब्बल ७२ प्राचीन मंदिरे असतील तर? ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे खरंय. झारखंडमधील मलूटी (Maluti) गावात हा ऐतिहासिक खजिना दडलाय.

PREV
15
कुठे आहे हे मंदिरांचं गाव?
झारखंडमधील एका गावात ऐतिहासिक वारसा दडलाय. एकेकाळी या गावात तब्बल १०८ मंदिरे होती. काळानुरूप काही नामशेष झाली असली तरी, उरलेली मंदिरे आजही त्या वैभवशाली काळाची साक्ष देतात. झारखंडच्या दुमका (Dumka) जिल्ह्यात मलूटी (Maluti) नावाचं हे छोटंसं गाव आहे. पश्चिम बंगालच्या सीमेजवळ, निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या गावाला 'टेम्पल व्हिलेज' म्हणतात. एकेकाळी १०८ मंदिरे असल्याने याला 'गुप्त काशी' म्हणूनही ओळखले जायचे. सध्या गावात ७२ टेराकोटा मंदिरे उरली आहेत. १७व्या ते १९व्या शतकादरम्यान ही मंदिरे बांधली गेल्याचे मानले जाते.
25
एकाच गावात इतकी मंदिरे कशी आली?
मलूटी गावाच्या इतिहासामागे एक रंजक कथा आहे. १५ व्या शतकात गौर प्रांतावर राज्य करणाऱ्या सुलतान अल्लाउद्दीन हुसेन शाहकडे एक पाळीव गरुड होता. तो गरुड एकदा हरवला, तेव्हा बसंत राय नावाच्या व्यक्तीने त्याला पकडून पुन्हा सुलतानाकडे सोपवले. या प्रामाणिकपणावर खूश होऊन सुलतानाने त्याला एक प्रदेश भेट म्हणून दिला. अशा प्रकारे बसंत राय या प्रदेशाचा शासक बनला. त्याचे वंशज बाज बसंत राजवंश म्हणून ओळखले जाऊ लागले. या राजघराण्यातील शासक अत्यंत श्रद्धाळू होते. राजवाडे बांधण्यापेक्षा त्यांनी मंदिर उभारणीला अधिक महत्त्व दिले. पुढे राजघराण्याचे चार वेगवेगळ्या शाखांमध्ये विभाजन झाले. प्रत्येक शाखेने आपली भक्ती आणि प्रतिष्ठा दाखवण्यासाठी मंदिरे बांधण्यास सुरुवात केली. एकमेकांपेक्षा जास्त मंदिरे बांधण्याची स्पर्धा सुरू झाली, असे झारखंड पर्यटन विभाग सांगतो. यातूनच काही वर्षांत मलूटी गाव मंदिरांचे संकुल बनले.
35
टेराकोटा शिल्पकला हेच मंदिरांचे वैशिष्ट्य
मलूटीतील मंदिरांची वास्तुकला त्यांना इतर मंदिरांपेक्षा वेगळे ठरवते. विटा आणि मातीपासून बनवलेल्या टेराकोटा पॅनल्सवर अद्भुत शिल्पे कोरलेली आहेत. रामायण, श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रसंगांसोबतच तत्कालीन लोकांची जीवनशैली, शिकार, युद्धाची दृश्येही या शिल्पांमध्ये पाहायला मिळतात. या मंदिरांच्या बांधकामावर बंगालच्या पारंपारिक शिल्पकलेचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. विशेषतः चारही बाजूंनी उतरते छत असलेली 'चार चला' (Char-chala) शैली येथील मंदिरांचे मुख्य आकर्षण आहे. बंगालमधील बिष्णुपूर येथील कुशल शिल्पकारांनी या मंदिरांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली होती, असे झारखंड पर्यटन विभागाने नमूद केले आहे.
45
शिवमंदिरे जास्त.. पण देवीच्या मंदिराची विशेष ओळख
मलूटीमधील बहुतांश मंदिरे भगवान शिवाला समर्पित आहेत. २०२५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधन अभ्यासानुसार, सध्या उरलेल्या ७२ मंदिरांपैकी ५७ शिवमंदिरे आहेत. याव्यतिरिक्त कालीमाता, दुर्गादेवी आणि भगवान विष्णूची मंदिरेही आहेत. मात्र या गावातील सर्वात खास मंदिर म्हणजे मौलिक्षा देवीचे (Moulakshi Temple) मंदिर. ही बाज बसंत राजवंशाची कुलदेवता मानली जाते. या मंदिरात देवीची पूर्ण मूर्ती नसून लाल रंगाच्या दगडातील चेहऱ्याच्या रूपात दर्शन होते. ही देवी सिंहवाहिनी दुर्गा मानली जाते. पश्चिम बंगालमधील तारापीठची देवी तारा हिची मौलिक्षा मोठी बहीण आहे, अशीही एक स्थानिक आख्यायिका आहे.
55
काळाच्या ओघात नामशेष होणारा ऐतिहासिक खजिना
एकेकाळी १०८ मंदिरांनी बहरलेल्या मलूटीमध्ये सध्या फक्त ७२ मंदिरे उरली आहेत. उर्वरित ३६ मंदिरे काळाच्या ओघात नष्ट झाली आहेत. पाऊस, हवामानातील बदल, झाडांची मुळे आणि देखभालीअभावी काही मंदिरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्याची गरज निर्माण झाली आहे. २०२२ च्या डिसेंबरमध्ये राज्यसभेत केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, मलूटीमधील १०८ मंदिरे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या (ASI) अखत्यारीत येत नाहीत. मात्र झारखंड सरकारने ६२ मंदिरांच्या संवर्धनाचे काम सुरू केले असून, त्यापैकी २० मंदिरांचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे. दुमका शहरापासून सुमारे ५५ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे.
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories