
Top 10 dirtiest city in India 2025: स्वच्छ सर्वेक्षण २०२५ चा अहवाल समोर आला असून, देशातील काही प्रमुख महानगरांच्या स्वच्छतेबाबतची स्थिती धक्कादायक ठरली आहे. बेंगळुरू, रांची, चेन्नई, लुधियाना आणि मदुराई ही शहरं या वर्षीच्या ‘भारतातील सर्वाधिक अस्वच्छ शहरं’ यादीत अग्रस्थानी आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे, लहान शहरांनी या वेळेस मोठ्या महानगरांना स्वच्छतेत मागे टाकत आपली छाप पाडली आहे.
भारताचं शहरी चित्र आजही विरोधाभासांनी भरलेलं आहे. एका बाजूला उंच इमारती आणि झगमगते मॉल्स, तर दुसऱ्या बाजूला कचऱ्याचे ढीग आणि तुंबलेले नाले. स्मार्ट सिटीच्या गाजावाजातही ‘स्वच्छ शहर’ हे स्वप्न अनेक ठिकाणी अद्याप अपूर्ण आहे.
सरकारच्या स्वच्छ भारत अभियान आणि स्वच्छ सर्वेक्षण यामुळे गेल्या काही वर्षांत काही शहरांनी उल्लेखनीय प्रगती केली असली, तरी अनेक ठिकाणी अजूनही कचरा व्यवस्थापन, नाल्यांची देखभाल आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत सेवांचा बोजवारा उडालेला आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२५ अहवालानुसार, अनेक लहान शहरांनी कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक स्वच्छतेत सुधारणा दाखवली आहे. मात्र, मोठ्या महानगरांमध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. बेंगळुरूसह अनेक शहरं अजूनही अव्यवस्थित नागरी नियोजन, कमी दर्जाचं कचरा व्यवस्थापन, आणि नागरिक शिस्तीच्या अभावामुळे अस्वच्छतेच्या यादीत सापडली आहेत.
‘भारताचं सिलिकॉन व्हॅली’ म्हणून ओळखलं जाणारं बेंगळुरू यावर्षी देशातील पाचवं क्रमांकाचं सर्वाधिक अस्वच्छ शहर ठरलं आहे. शहराच्या झपाट्याने वाढणाऱ्या विस्तारामुळे आणि शिस्तहीन नागरी व्यवस्थापनामुळे स्वच्छतेची स्थिती ढासळली असल्याचं अहवालात नमूद आहे.
याच यादीत रांची, चेन्नई, लुधियाना आणि मदुराई ही शहरं देखील आहेत. दुसरीकडे अहमदाबाद, भोपाळ, लखनौ, रायपूर आणि जबलपूर यांसारख्या शहरांनी उत्तम कामगिरी करत ‘स्वच्छ शहरांच्या यादीत’ स्थान मिळवलं आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीलाही या यादीत स्थान मिळालं असून ती देशातील दहावी सर्वाधिक अस्वच्छ शहर ठरली आहे. मात्र, इंदूर, सूरत आणि नवी मुंबई यांनी आपली परंपरा कायम ठेवत यंदाही “सुपर स्वच्छ लीग”मध्ये स्थान मिळवलं आहे.
या वर्षीच्या निकालांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की, अनियोजित शहरी विस्तार, अकार्यक्षम कचरा विल्हेवाट, आणि नागरिक बेफिकिरी ही भारतातील महानगरांसमोरील सर्वात मोठी आव्हानं ठरली आहेत. औद्योगिक प्रदूषण, पर्यटनामुळे वाढलेला कचरा आणि कमी देखभालीमुळे अनेक ऐतिहासिक व सांस्कृतिक शहरांची प्रतिमा मलिन होत आहे. भारत ‘स्वच्छ आणि टिकाऊ शहरांच्या भविष्याकडे’ वाटचाल करत असला, तरी या यादीने अजून मोठा प्रवास बाकी असल्याची जाणीव पुन्हा करून दिली आहे.
| क्रमांक | शहर | गुण |
| 1 | मदुराई | 4823 |
| 2 | लुधियाना | 5272 |
| 3 | चेन्नई | 6822 |
| 4 | रांची | 6835 |
| 5 | बेंगळुरू | 6842 |
| 6 | धनबाद | 7196 |
| 7 | फरीदाबाद | 7329 |
| 8 | ग्रेटर मुंबई | 7419 |
| 9 | श्रीनगर | 7488 |
| 10 | दिल्ली | 7920 |
स्त्रोत: स्वच्छ सर्वेक्षण २०२५ अहवाल