Raja Raghuvanshi : सोनम रघुवंशीला सुप्रीम कोर्टाचा दणका, जामीन रद्द; पुन्हा जेलमध्ये जाणार

Published : Jul 23, 2026, 08:01 PM IST
Raja Raghuvanshi : सोनम रघुवंशीला सुप्रीम कोर्टाचा दणका, जामीन रद्द; पुन्हा जेलमध्ये जाणार

सार

इंदूरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मुख्य आरोपी असलेल्या सोनम रघुवंशीचा जामीन रद्द केला आहे. सोनममुळे खटल्यात अडथळा येऊ शकतो, असं सांगत कोर्टाने तिला तुरुंगात जाण्याचे आदेश दिले आहेत.

इंदौर : पतीच्या हत्येचा आरोप असलेल्या सोनम रघुवंशीला सुप्रीम कोर्टाने मोठा दणका दिला आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीत कोर्टाने तिचा जामीन रद्द केला. मेघालयमध्ये हनिमूनला गेले असताना सोनमने पती राजा रघुवंशीची हत्या केल्याचा आरोप आहे. सोनम जामिनावर बाहेर राहिल्यास खटल्याच्या कामकाजात अडथळा येऊ शकतो, असं स्पष्ट मत नोंदवत कोर्टाने तिला तुरुंगात जाण्याचे आदेश दिले आहेत.

सोनमला पुन्हा जामिनासाठी अर्ज करण्याची संधी

न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती पी. बी. वराळे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने सोनमच्या बाजूने दिलेला जामिनाचा आदेश रद्द केला आणि तिला दोन आठवड्यांच्या आत आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, कोर्टाने हेही स्पष्ट केलं आहे की, जर सहा महिन्यांच्या आत खटला पूर्ण झाला नाही, तर ती ट्रायल कोर्टासमोर पुन्हा जामिनासाठी अर्ज करू शकते.

सुप्रीम कोर्टाने सोनमचा जामीन का रद्द केला?

कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं आहे, "आमच्या मते, या टप्प्यावर आरोपी (सोनम) जामिनावर बाहेर राहिल्याने सुरू असलेल्या खटल्यात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे, आम्ही जामीन रद्द करत आहोत. आरोपीला आत्मसमर्पण करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. जर सहा महिन्यांत खटला पूर्ण झाला नाही, तर आरोपी जामिनासाठी अर्ज करू शकते."

राजा रघुवंशी हत्या प्रकरणाची संपूर्ण टाइमलाइन

लग्नानंतर सोनम पती राजा रघुवंशीसोबत हनिमूनसाठी मेघालयला गेली होती. तिथे तिने तीन साथीदारांच्या मदतीने राजाची हत्या केली, असा आरोप आहे. या घटनेनंतर सोनम गायब झाली होती, त्यामुळे एफआयआर दाखल करण्यात आला. पुढे, ९ जून २०२५ रोजी तिने उत्तर प्रदेशच्या गाझीपूर जिल्ह्यातील नंदगंज पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केलं. त्यानंतर तिला अटक करण्यात आली आणि ट्रांझिट रिमांडसाठी मुख्य कोर्टात हजर केलं गेलं.

सुप्रीम कोर्टात काय झाला युक्तिवाद?

सुप्रीम कोर्टात सरकारी पक्षाने जोरदार युक्तिवाद केला. त्यांनी सांगितलं की सोनमवर खूप गंभीर आरोप आहेत आणि घटनेनंतर ती का गायब झाली, याचं कोणतंही कारण तिने दिलेलं नाही. ९ जून २०२५ रोजी अटकेची कारणं आणि आवश्यक कागदपत्रं तिला देण्यात आली होती, असंही त्यांनी स्पष्ट केलं. अटकेच्या कारणांमध्ये चुकून कलम ४०३(१) लिहिलं गेलं होतं, पण ते कलम १०३(१) हवं होतं. ही फक्त एक टायपिंगची चूक होती, असंही सरकारी पक्षाने सांगितलं. या टायपिंगच्या चुकीमुळेच तिला जामीन मिळाला होता. मात्र इतक्या मोठ्या गुन्ह्यासाठी आता तिला जामीन मिळणार, जामिनाचा तिला हक्क नाही, असं कोर्टाने सांगितल्याची माहिती आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

अण्णा हजारे यांची धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी | CJP | Protest | Students
या राज्यातील विद्यार्थ्यांचे फुटले पेपर, विद्यापीठानं परीक्षा केली रद्द