
हैदराबाद: आतापर्यंत भारतात रॉकेट अवकाशात झेपावण्याचं काम भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांच्या अखत्यारीत होतं. पण आता तेच काम खासगी क्षेत्रातही सुरू होणार आहे! हैदराबादस्थित स्टार्टअप ‘स्कायरूट एअरोस्पेस’ (Skyroot Aerospace) येत्या तीन महिन्यांत भारताचं पहिलं खासगी व्यावसायिक रॉकेट लाँच करण्याच्या तयारीत आहे. दोन माजी इस्रो वैज्ञानिकांनी स्थापन केलेल्या या कंपनीने जानेवारी 2026 पर्यंत आपलं पहिलं पूर्ण आकाराचं उपग्रह मिशन अवकाशात पाठवण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. या प्रकल्पामुळे भारताच्या अवकाश क्षेत्रात खासगी सहभागाची नवी पर्वा सुरू होत असल्याचं मिंट या वृत्तसंस्थेने नमूद केलं आहे.
‘स्कायरूट एअरोस्पेस’ला Temasek आणि GIC सारख्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचा पाठिंबा आहे. कंपनी 2026 पासून दर तीन महिन्यांनी एक रॉकेट लाँच करण्याचं उद्दिष्ट ठेवत असून, 2027 पासून दर महिन्याला एक लाँच करण्याचा मानस आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवन चंदना यांनी सांगितलं की, “एक रॉकेट तयार करायला सुमारे आठ ते नऊ महिने लागतात आणि त्यासाठी 2 ते 3 दशलक्ष अमेरिकन डॉलर (सुमारे ₹16 ते ₹25 कोटी) खर्च येतो. मात्र, प्रत्येक लाँचमधून सुमारे 5 दशलक्ष डॉलर (₹42 कोटी) इतकं उत्पन्न अपेक्षित आहे.” हे उत्पन्न भारतातील तसेच आंतरराष्ट्रीय ग्राहकांकडून मिळणाऱ्या पेलोड्समुळे असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
2018 मध्ये स्थापन झालेल्या ‘स्कायरूट एअरोस्पेस’ने आजवर सुमारे 95.5 दशलक्ष डॉलर (₹850 कोटी) निधी उभारला आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये या कंपनीने ‘विक्रम-S’ या उपकक्षीय वाहनाचं यशस्वी प्रक्षेपण करून पहिली खासगी भारतीय रॉकेट लाँच करणारी कंपनी म्हणून इतिहास रचला होता. कंपनीने मार्च 2028 पर्यंत नफा मिळवण्याचं लक्ष्य ठेवले आहे. सध्या काही अभियांत्रिकी आणि पुरवठा साखळीतील अडचणी असल्या तरी, लहान उपग्रहांच्या वाढत्या जागतिक मागणीमुळे कंपनीला प्रचंड संधी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
सध्या भारताच्या खासगी अवकाश क्षेत्रात 200 पेक्षा अधिक स्टार्टअप्स कार्यरत आहेत. अंतराळ विभागाच्या मते, 2033 पर्यंत भारतीय अवकाश उद्योगाची एकूण किंमत 44 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचू शकते. ‘स्कायरूट एअरोस्पेस’चं आगामी मिशन भारतीय आणि जागतिक ग्राहकांसाठी स्वस्त आणि अधिक उपलब्ध अवकाश लाँचिंगच्या नव्या शक्यता निर्माण करेल, अशी अपेक्षा आहे.