
Pushkar Cattle Fair : २३ कोटींचा रेडा आणि १५ कोटींचा घोडा हे यावर्षी राजस्थानमध्ये होणाऱ्या वार्षिक पुष्कर पशुमेळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले आहेत. दरवर्षी होणाऱ्या पुष्कर मेळ्यात भारतातील सर्वात महागडे प्राणी प्रदर्शित केले जातात. असे प्राणी खरेदी करण्यासाठी आणि पाहण्यासाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने लोक येतात, हे विशेष.
२३ कोटी रुपये किमतीचा राजस्थानचा 'अनमोल' नावाचा रेडा या मेळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. हा सामान्य रेडा नाही, त्याचे वजनच १५०० किलो आहे. दररोज हजारो रुपये खर्च करून या रेड्याला काजु-बदाम मिश्रित विशेष खाद्य दिले जाते. त्याचा उपयोग प्रजननासाठी केला जातो. यातूनच महिन्याला ४ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. तर उज्जैनच्या 'राणा' नावाच्या दुसऱ्या रेड्याला २५ लाख रुपयांपर्यंतची बोली लागली आहे. ६०० किलो वजन, ८ फूट लांब आणि ५.५ फूट उंच असलेल्या या रेड्याच्या खाद्द्यावर दररोज १५०० रुपये खर्च करतो, असे मालक सांगतात.
चंदीगडच्या गेरी गिल यांचा अडीच वर्षांचा 'शाहबाज' नावाचा घोडा पुष्कर मेळ्यात सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अनेक स्पर्धा जिंकलेल्या या मारवाडी जातीच्या घोड्यासाठी ग्राहकांनी आतापर्यंत १५ कोटींपर्यंतची किंमत देऊ केली आहे. त्याचप्रमाणे, मेळ्यात प्रदर्शित केलेल्या 'बादल' नावाच्या घोड्यालाही मोठी मागणी आहे. ११ कोटी रुपये देऊन हा घोडा खरेदी करण्यासाठी लोक पुढे आले आहेत. मात्र, मालकांनी हा घोडा विकण्यास नकार दिला आहे.