
Report : भारतात सध्या ऑनलाइन शॉपिंग मोठ्या प्रमाणावर होत आहे. ॲप आधारित सर्व्हिस देणाऱ्या कंपन्या दिवसागणिक वाढत चालल्या आहेत. त्यांच्यात आता एक प्रकारे स्पर्धाच सुरू झाली आहे. त्यातून बहुतांश सर्व वस्तूंवर मोठे डिस्काऊंट किंवा विविध ऑफर ग्राहकांना दिल्या जात आहे. त्याचा फायदा थेट ग्राहकांना होत आहे. फळे, भाज्या आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंबरोबरच इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात असल्याचे दिसते. मात्र, याशिवायही इतर वस्तूंच्या मागण्याही नोंदवल्या जात आहेत. 2025 मध्ये भारतीयांनी ऑनलाइन वस्तू कशा खरेदी केल्या आहेत, याचा एक धक्कादायक रिपोर्ट स्विगी इन्स्टामार्टने (Swiggy Instamart) प्रसिद्ध केला आहे. यामध्ये चेन्नईतील एका व्यक्तीने केलेली ऑर्डर सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.
चेन्नईतील एका व्यक्तीने या एका वर्षात तब्बल 1,06,398 रुपयांचे निरोध ऑर्डर केले आहेत. त्याने एकूण 228 वेळा वेगवेगळ्या ऑर्डर केल्या आहेत. म्हणजेच, महिन्याला सरासरी 19 ऑर्डर! हे पाहून आश्चर्यचकित झालेल्या स्विगी व्यवस्थापनाने याला "नियोजनाचा कळस" (Planning Ahead) असे गंमतीने म्हटले आहे.
त्याचप्रमाणे, सप्टेंबर महिन्यात निरोधच्या विक्रीत 24% वाढ झाली आहे. प्रत्येक 127 ऑर्डरमागे एक निरोधचे पॅकेट असल्याचेही समोर आले आहे.
फक्त निरोधच नाही, तर संपूर्ण भारतात अनेक विचित्र ऑर्डर्सची नोंद झाली आहे.
• मुंबई : एका व्यक्तीने फक्त शुगर-फ्री 'रेड बुल' (Red Bull Sugar Free) साठी 16.3 लाख खर्च केले आहेत.
• चेन्नई : एका व्यक्तीने पाळीव प्राण्यांच्या वस्तूंसाठी (Pet Supplies) 2.41 लाख खर्च केले आहेत.
• हैदराबाद : एका व्यक्तीने एकाच वेळी 3 'आयफोन 17' (iPhone 17) 4.3 लाखांना खरेदी केले आहेत.
• कोची : २०२५ मधील टॉप स्पेंडर म्हणून कोचीमधील एका व्यक्तीने 22 लाखांपर्यंत खर्च केला आहे. यामध्ये 22 आयफोन आणि सोन्याच्या नाण्यांचा समावेश आहे.
"तंत्रज्ञानाची राजधानी" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळूरूने आता "टिप देणारी राजधानी" हा किताबही मिळवला आहे. बंगळूरूमधील एका व्यक्तीने यावर्षी डिलिव्हरी कर्मचाऱ्यांसाठी 68,600 रुपयांची टिप दिली आहे. तर, चेन्नईतील एका व्यक्तीने 59,505 टिप देऊन दुसरा क्रमांक पटकावला आहे.