
Gwalior Marriage Scam Busted : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये पोलिसांनी एका धक्कादायक विवाह फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. भाटीपूर येथे छापा टाकून पोलिसांनी दोन कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या 19 तरुणींना अटक केली. तपासात असे समोर आले की, या तरुणी लग्नाच्या नावाखाली अविवाहित तरुणांची फसवणूक करत होत्या.
पोलिसांच्या माहितीनुसार, या रॅकेटच्या माध्यमातून छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा, बिहार आणि मध्य प्रदेशातील 1500 हून अधिक अविवाहित तरुण फसवणुकीला बळी पडले. या तरुणांना बनावट मुलींचे फोटो आणि बायोडाटा पाठवून त्यांच्याकडून पैशांची मागणी केली जात होती.
17 तरुणी स्वतःला वधू म्हणून भासवून तरुणांशी बोलायच्या. या कॉल सेंटरच्या मुख्य सूत्रधार राखी गौड (24) आणि सीता उर्फ शीतल चौहान (26) होत्या. या महिला तरुणांकडून 3 ते 5 हजार रुपये नोंदणी शुल्क घेत आणि नंतर 5 ते 10 हजार रुपयांच्या पॅकेजमध्ये बनावट संभाषण घडवून आणत होत्या.
तपासात असे समोर आले की, कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्यांना व्हिडिओ कॉल करण्यास मनाई होती. याचे कारण असे की, ज्या मुलींशी तरुणांना लग्न करायचे होते, त्यांचे फोटो अभिनेत्रींसारखे सुंदर असायचे, तर कॉल करणाऱ्या तरुणी तितक्या सुंदर नव्हत्या. त्यामुळे बनावट फोटो आणि बायोडाटा वापरला जात होता.
कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणींना 5-6 हजार रुपये पगार मिळत होता. याशिवाय, फसवणुकीवर त्यांना 10 टक्के इन्सेंटिव्हही दिला जात होता. अविवाहित तरुणांचा डेटा आणि माहिती तिलेश्वर पटेल नावाचा व्यक्ती वेगवेगळ्या वेबसाइट्स आणि मॅरेज ब्युरोमधून पुरवत होता.
एसएसपी धर्मवीर सिंह यांनी सांगितले की, माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी भाटीपूरमध्ये छापा टाकून या रॅकेटचा पर्दाफाश केला. हे प्रकरण दाखवते की लग्न आणि प्रेमाच्या नावाखाली किती सहज फसवणूक केली जाऊ शकते. सोशल मीडिया आणि ऑनलाइन डेटिंग प्लॅटफॉर्मवर सावधगिरी न बाळगल्यास कोणताही तरुण बळी पडू शकतो. पोलिसांनी या प्रकरणी कठोर कारवाई केली आहे, पण समाज आणि कुटुंबांनीही सतर्क राहण्याची गरज आहे.